अशा प्रकारे अॅमेझॉनच्या माध्यमातून बुक करु शकता गॅस सिलेंडर


नवी दिल्ली – सर्वसामान्यपणे आपल्या पैकी अनेक दर महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीने गॅस सिलेंडर बुक करतोच. पण आता आणखी एक पर्याय घरगुती गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. ग्राहक नेहमीच अ‍ॅमेझॉनवरून वेगवेगळ्या वस्तू ऑर्डर करत असतात. पण आता अ‍ॅमेझॉनवर ग्राहकांना सिलेंडर बुक करता येणार आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडशी अ‍ॅमेझॉन इंडियाने करार केला आहे. त्यानुसार आता अ‍ॅमेझॉनवरुन पैसे भरुन एचपी (HP) कंपनीचा सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना सिलेंडर घेता येणार आहे.

त्यामुळे IVRच्या माध्यमातून ग्राहकांना सिलेंडर बुक करण्याची आवश्यकता नाही. सिलेंडर बुक करायचा असल्यास थेट अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. अ‍ॅमेझॉन पे टॅबवर जाऊन बुकिंग करावे लागेल. त्यानंतर पैसे कोणत्याही डिजिटल मोडचा वापर करून देता येतील. डिजिटल पेमेंटमध्ये सातत्याने नवनवीन अनुभव आणण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याची माहिती अ‍ॅमेझॉन पे चे सीईओ महेंद्र नेरुरकर यांनी दिली आहे. ग्राहकांना अ‍ॅलेक्सा आणि फायर टीव्ही स्टिक या तंत्रज्ञानाच्या मदतीनेही सिलेंडर बुक करता येणार आहे. पण ही सुविधा फक्त HP गॅस कंपनीच्या ग्राहकांनाच देण्यात आली असून अ‍ॅमेझॉनवरून सिलेंडर त्यांनाच बुक करता येणार आहे.