मध्य प्रदेश सरकारची चिनी, परदेशी फटाक्यांवर बंदी


भोपाळ – दिवाळीपूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक मोठा निर्णय घेतला असून त्यानुसार चिनी आणि अन्य परदेशी फटाक्यांची साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर राज्यात पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विना परवाना चिनी आणि अन्य परदेशी फटाक्यांच्या आयातीवर पूर्णपणे बंदी आहे. चिनी आणि अन्य परदेशी फटाक्यांच्या आयातीसाठी डायरेक्ट जनरल फॉरेन ट्रेडद्वारे कोणतेही परवाने देण्यात आले नसल्याचे मध्यप्रदेश सरकारने स्पष्ट केले आहे.

यासंदर्भातील निर्देश सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना मध्यप्रदेश सरकारचे अपर मुख्य सचिव (गृह) डॉ. राजेश राजौर यांनी दिले आहेत. तसेच या फटाक्यांची विक्री, वाहतूक आणि साठवणुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर कायद्याचे उल्लंघन केल्यास दोन वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे.

तत्पूर्वी यासंदर्भात एका उच्चस्तरीय बैठकीचे बुधवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आयोजन केले होते. चिनी फटाके आणि त्यांचा वापर करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर त्याचा वापर केल्यास संबंधितांवर ‘एक्स्प्लोसिव्ह अॅक्ट’ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत स्थानिक वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. त्याचबरोबर दिवाळीदरम्यान मातीच्या पणत्यांची खरेदी करावी जेणेकरून स्थानिकांना रोजगार मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.