अमेरिकेच्या निवडणुकीत मराठमोळे ठाणेदार मिशिगनमधून झाले आमदार


वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीतील रंगत आता शिगेला पोहोचली आहे. डेमोक्रिटिकचे उमेदवार जो बायडन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. या निवडणुकीच्या धामधुमीत अमेरिकेत एका मराठमोळ्या नावाचा डंका वाजला आहे. मिशिगन राज्यातून श्री ठाणेदार यांनी शानदार विजय मिळवत आमदारकी मिळवली आहे. मिशिगन राज्यातून यावर्षी ‘हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह’ म्हणजेच विधानसभेची निवडणूक श्री ठाणेदार यांनी लढवली. त्यांचे एक यशस्वी उद्योजक – ही श्रीची इच्छा प्रसिध्द आत्मचरित्र आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे आजपर्यंत मोठे देणगीदार असलेले श्री ठाणेदार आता पक्षाचे लोकनियुक्त प्रतिनिधी झाले आहेत.

अमेरिकेत 24 व्या वर्षी गेलेल्या ठाणेदार यांनी आपला झेंडा अमेरिकन राजकारणात रोवला आहे. 25 हजार मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे. 93 टक्के मते त्यांना मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला केवळ 6 टक्के मते मिळाली. 2018 मध्ये राज्याच्या गव्हर्नरपदासाठी त्यांनी निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांना दोन लाखांहून जास्त मते मिळाली होती. आत्ताच्या निवडणुकीत त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

यावेळी ठाणेकर म्हणाले की, निवडणुकीचा हा अनुभव खूप चांगला होता. मी वयाच्या 24 व्या वर्षी अमेरिकेत आलो. आपल्यासारखा दिसणारा बोलणारा नेता लोकांना हवा असतो. त्यामुळे मला खूप काम करावे लागले. लोकांना घरोघरी जाऊन समजवावे लागले. मी 25 हजार मतांनी जिंकलो. 93 टक्के मते मला मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवाराला केवळ 6 टक्के मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणेदार पुढे म्हणाले की, कोरोना संकटकाळाच्या आधीच मी प्रचाराला सुरुवात केली होती. मिशीगन गव्हर्नरच्या पदासाठी दोन वर्षापूर्वी उभा होतो. मी आता आमदार म्हणून निवडून आलो आहे. राजकारणात प्रत्यक्ष उतरणे आवश्यक आहे. बाहेर बसून नावे ठेवण्यात अर्थ नाही. प्रत्यक्ष तिथे जाऊन प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. या देशाने मला खूप काही दिले असल्यामुळे मी त्यांचे देणे लागतो, मला खूप काम करायचे असल्याचे ठाणेदार म्हणाले. त्याचबरोबर मुख्य निवडणुकीचे तिकिट मिळवण्यासाठी आधी पक्षांतर्गत निवडणूक होते. त्यातून विजयी होणाऱ्याला तिकिट मिळते. प्रायमरीमध्ये डेमोक्रेटिक पक्षाने मला निवडून दिले. शिक्षण, रस्ते, उद्योगांवर मला काम करायचे आहे. गरीबांसाठी काम करायचे असल्याचे ते म्हणाले.

त्यांना ट्रम्प यांच्या न्यायालयात जाण्याच्या निर्णयाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, जो बायडन आणि डेमोक्रेटिक पक्ष निवडणुकीत निवडून येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ट्रम्प यांना पराभव स्वीकारायचा नसल्यामुळे ते आता न्यायालयात गेले आहेत. बायडन हेच अमेरिकेचे राष्ट्रपती होतील, असे ठाणेदार म्हणाले. ट्रम्प यांना असे करण्याची सवय आहे. ट्रम्प न्यायालयात गेले तरी काही फरक पडणार नाही, न्यायालयीन पद्धती चांगली आहे. फक्त आम्हाला काही दिवस यातून जावे लागणार असल्याचे म्हणाले.