हॉलीवू़डपटात झळकू शकतो बॉलीवूडचा हँडसम हंक


हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी कामे केली आहेत. त्याचबरोबर त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या यादीत आता बॉलिवूडचा हँडसम हंक अर्थात अभिनेता हृतिक रोशन याचे देखील नाव जोडले जाऊ शकते. हृतिक रोशनने यावर्षी फेब्रुवारीमध्ये एक अमेरिकन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी हायर केली होती. हॉलिवूडमध्ये ही टॅलेंट एजन्सी हृतिकला प्रमोट करणार आहे.

त्यानंतर ८ महिन्यांनंतर अशी माहिती समोर येत आहे की, हॉलिवूडपटात काम करण्याची ऑफर हृतिक रोशनला मिळाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हृतिक रोशन लवकरच त्या हॉलिवूडपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. त्याचबरोबर अशी देखील माहिती आहे की, हॉलिवूडच्या या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात हृतिक रोशन एका गुप्तहेराची मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी त्याने ऑडिशन टेपही रेकॉर्ड करून स्टुडिओला पाठवली आहे. पण अजून हृतिकच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. पण असे मानले जात आहे की, ‘कृष 4’ चे चित्रीकरण पूर्ण करून तो लवकरच अमेरिकेसाठी रवाना होऊ शकतो. आता हे बघावे लागेल की, हृतिकला हॉलिवूड स्टुडिओ गुप्तहेराच्या भूमिकेसाठी प्राधान्य देतात की नाही.