अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी


मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात अर्णब गोस्वामी यांच्या जामिनावरील सुनावणी टळल्यामुळे त्यांचा आजचा मुक्काम न्यायालयीन कोठडीतच असणार आहे. न्यायालयात उद्या पुन्हा सुनावणी होणार असल्यामुळे अर्णब गोस्वामींचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

दरम्यान, अर्णब यांच्या वकिलांनी अलिबाग न्यायालयातील जामीन अर्ज मागे घेतला आहे. दोन ठिकाणी जामीन अर्ज दाखल केल्याने सुनावणीबाबत अडचण होण्याची शक्यता असल्यामुळे अलिबाग न्यायालयातील जामीन अर्ज वकीलांनी मागे घेतला आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयातील अर्णब गोस्वामींच्या जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत टळली आहे. जामिनावर उद्या दुपारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

तत्पूर्वी अलिबाग कोर्टातील जामीन अर्ज अर्णब गोस्वामी यांच्या वकीलाने मागे घेतला. अलिबाग न्यायालयातील अर्ज मागे घेतल्यानंतरच उच्च न्यायालयात सुनावणी शक्य होती. या तांत्रिक अडचणीमुळे अर्णब यांच्या जामिनावरील सुनावणी आज होऊ शकली नसल्याचे सांगण्यात येत आहे.