विषापासून बनते औषध

विष माणसाला मारते, हे तर सर्वांनाच माहीत आहे. परंतु लस करण्याच्या शास्त्रामध्ये विषाचाच उपयोग लसीसाठी केला जातो. विशेषत: सापाचे विष सर्पदंशविरोधी औषधात वापरले जाते. सापाचे विष काढून ते मेंढी किंवा शेळी अशा प्राण्यांना टोचले जाते. मग तो प्राणी त्या विषाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काही विरोधी द्रव्ये तयार करायला लागतो आणि सापाच्या विषावर स्वत:च्या शरीरातच उतारा तयार करायला लागतो. तो उतारा म्हणजेच सर्पदंशविरोधी उपाय. या निमित्ताने तयार झालेले द्रव्य मेंढीच्या शरीरातून काढून माणसावर इलाज करण्यासाठी वापरले जाते. अशा रितीने या विषाचा उपयोग विषविरोधी उपाय म्हणून होतो, हे आपल्याला वर्षानुवर्षे माहीत झालेले आहे. परंतु विषाचा उपयोग अन्यही काही प्रकारे आणि काही औषधे तयार करण्यासाठी करता येऊ शकतो, असे आता दिसायला लागले आहे. अशा औषधांसाठी केवळ सापांचेच नव्हे तर विंचू आणि पाली यांचेही विष वापरता येते, असे काही संशोधकांनी दाखवून दिले आहे.

विंचवाच्या विषापासून नुकतेच एक होमिओपाथिक औषध तयार करण्यात आले आहे. याच धर्तीवर सापाच्याही विषाचा उपयोग होऊ लागलेला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ डेल्वेअर या विद्यापीठातील स्टिफन हॅले या संशोधकाने सापाच्या विषापासून काही औषधे तयार केलेली आहेत. आशिया खंडात सापडणार्‍या काही विशिष्ट सापांच्या विषापासून त्यांनी एरिस्टोस्टेटिन हे द्रव्य तयार केले आहे आणि या द्रव्याचा वापर कर्करोग प्रतिबंधक औषधामध्ये करता येऊ शकतो, असा दावा केला आहे. यापूर्वीही सापाच्या विषातील एरिस्टोस्टेटिनस्च्या काही उपयोगावर संशोधन करण्यात आले होते. परंतु डॉ. हॅले यांनी अधिक संशोधन करून एरिस्टोस्टेटिनचा नेमका कसा परिणाम होतो, हे शोधून काढले आहे.

मॅलानोमा कॅन्सर सेल्स आणि एरिस्टोस्टेटिन यांच्यातील द्वंद्व कसे साकार होते हे समजावे यासाठी त्यांनी ऍटोमिक फोर्स मायक्रोस्कोपी हे नवीन तंत्र विकसित केले आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर तो या कर्करोगावर प्रभावी इलाज म्हणून उपयोगात येणार आहे. दक्षिण अमेरिकेत सापडणार्‍या रॅटल स्नेक या सापाच्या विषापासून क्रोटोक्झिन नावाचे औषध तयार करण्यात आलेले आहे. ते एक प्रकारचे प्रथिन आहे आणि त्याचाही वापर कर्करोग दुरुस्त करण्यासाठी होऊ शकतो, असे हे प्रथिन तयार करणार्‍या डॉक्टरांचे म्हणणे आहे. क्रोटोक्झिन हे कोणत्या प्रकारच्या कर्करोगावर गुणकारी ठरू शकते आणि ते तो कर्करोग होणार्‍या पेशींवर कसा मारा करते याची प्रक्रिया या तज्ज्ञांनी शोधून काढलेली आहे. मात्र अजून तरी त्याच्या वापराला परवानगी मिळालेली नाही. डब्लीन येथील सेल्टिक बायोटेक या संशोधन संस्थेत क्रोटोक्झिन या औषधावर अधिक संशोधन करून चाचण्या घेतल्या जात आहेत. परंतु सापाच्या विषाचा सर्वाधिक प्रभावी वापर सिंगापूरमधील युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर या विद्यापीठात शोधण्यात आला आहे. तिथे प्रयोग करणारे भारतीय डॉक्टर किणी मंजुनाथ यांनी नागाच्या विषापासून एक वेदनाशामक तयार केले आहे. हे वेदनाशामक म्हणजे हॅनलजेसिनचा एक प्रकार आहे.

वेदनाशामक म्हणून सध्या मॉर्फिनचा वापर केला जातो. परंतु आपण तयार केलेले हे सापाच्या विषाचे औषध मॉर्फिनपेक्षा कमीत कमी २० पट आणि जास्तीत जास्त २०० पट प्रभावी आहे, असा किणी मंजुनाथ यांचा दावा आहे. मॉर्फिनचे इंजेक्शन घ्यावे लागते, परंतु मंजुनाथ यांचे औषध गोळीच्या रुपात घेतले जाते. या औषधाचे काय काय प्रकार तयार करता येतील यावर मंजुनाथ यांचा प्रयत्न चालला आहे. २०१३ आणि २०१४ अशी दोन वर्षे या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या होतील आणि २०१६ पर्यंत हे विषापासून तयार केलेले वेदनाशामक बाजारात विक्रीस येईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment