शुभेच्छा पत्रे इतिहासजमा होण्याच्या मार्गावर

greeting
ई कार्ड शुभेच्छा पत्रांनी सातत्याने उभे केलेले आव्हान स्वीकारण्यात अपयशी ठरलेला प्रिंटेड कार्ड बाजार आता शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसून आले आहे. सोशल मिडीयाने या व्यवसायाचे कंबरडेच मोडले आहे. नवीन वर्ष, दिवाळी, नाताळ, वाढदिवस अशा अनेक कारणांनी दिली जाणारी ही ग्रिटींग कार्डस आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर असून प्रिंटेड कार्डचा बाजार सध्या केवळ लग्नपत्रिकांमुळे थोडा फार टिकून राहिला असल्याचे या व्यवसायातील ट्रेडर्स, वितरक आणि विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

दिल्लीत आशियातील सर्वात मोठा होलसेल बाजार असलेल्या चावडी बाजार येथे कार्ड व पेपर उद्योगातील १ हजाराहून अधिक ट्रेडर्स या व्यवसायाची सद्दी संपत आल्याचे सांगत आहेत. सध्याचा ९० टक्के व्यवसाय केवळ लग्नपत्रिकांमुळे टिकून असल्याचे सांगताना संघटनेचे अध्यक्ष विष्णू मुरारी गुप्ता म्हणाले नाताळ, नवीन वर्ष यासाठी येथून युरोप अमेरिकेतही कार्डे निर्यात केली जात असत मात्र हा बाजार आता जवळजवळ संपुष्टात आला आहे. स्थानिक बाजारातही या शुभेच्छा पत्रांना मागणी नाही. एक शुभेच्छा पत्र किमान १० ते १५ रूपयांना मिळते शिवाय ते पाठविण्याचा खर्च वेगळा येतो. त्याऐवजी लोक ई कार्डना अधिक पसंती देत आहेत.

या क्षेत्रातील नामवंत चेन आर्चिसची एकट्या दिल्लीत ५० स्टोअर्स आहेत. या दुकानातील विक्रीही ५० टक्के रोडावल्याची माहिती मिळाली. या कंपनीनेही ऑनलाईन कार्ड विक्रीवर अलिकडेच फोकस केला आहे मात्र ऑनलाईन कार्ड खरेदी अधिक महागात जाते त्यामुळे त्याला कसा प्रतिसाद मिळेल याची शाश्वती नसल्याचेही सांगितले जात आहे.

1 thought on “शुभेच्छा पत्रे इतिहासजमा होण्याच्या मार्गावर”

Leave a Comment