रेशमाची वैशिष्ठे आणि त्यापासून बनणार्‍या वस्तू


रेशीम हे मुळातच उष्णतेचा मंद वाहक आहे. त्यामुळे शरीराजवळची उष्णता अडवली जाते.थंडीत उबदार आणि उन्हाळ्यात थंड असे या कापडाचे वैशिष्ठ. रेशमी जास्त आर्द्रता शोषते पण तुलनेने कोरडे राहते.त्वचेतील तेल शोषते पण धूळ मात्र चिकटू देत नाही.अर्थात वेगवेगळे रंग हे रेशीम सहज शोषून घेते आणि त्यामुळे अनेक आकर्षक रंगातील रेशीम तयार करणे सहज शक्य होते.

आज जगात कापड उद्योगाचा विकास प्रचंड प्रमाणात झाला आहे. मात्र रेशीम उद्योगाकडे देशाच्या आर्थिक विकासाचे साधन म्हणून पाहिले जाते. आशियातील चाळीस देशात रेशीम उत्पादन होते. साड्या, विविध प्रकारची वस्त्रे बनविण्यासाठी लागणारे कापड, गालिचे, पडदे, सोफा कव्हर, सूटस, कोट, टाय, जॅकेटस्, शर्ट, लिंगरीज, होजिअरी, मोजे, लेस लायनिंग, हँडबॅग्ज, अशा विविध प्रकारच्या वस्तू रेशमापासून बनतातच पण पूर्वीच्या काळी भरतक लेबरोबरच सायकलचे टायरट्यूब, संगीत वाद्यांच्या तारा बनविण्यासाठीही या घट्ट, तलम धाग्याचा उपयोग केला जात असे. कोशावस्थेत जाणारी अळी आम्लामध्ये म्हणजे अॅसिडमध्ये मारून तिच्या तोंडाजवळच्या ग्रंथीतून हा धागा मिळविला जात असे. या धाग्याला गट म्हटले जाई आणि जखमेला टाके घालण्यासाठी या धाग्याचा वापर शल्यविशारद करत असत.

भारतातून अन्य देशात वस्त्रनिर्यात होत असे याचे पुरावे इतिहासात जागोजागी सापडतात. कल्याण बंदर हे निर्यातीचे मुख्य केंद्र होते. इजिप्तमधल्या पिरॅमिडमध्येही ममीभोवती गुंडाळलेले रेशीमवस्त्र सापडले आहे. हा काळ दुसर्‍या शतकातला आहे. तेराव्या शतकातल्या हस्तलिखितात वर्णन सापडतं की या काळात इंडोनेशियात भारतीय रेशीम अत्यंत लोकप्रिय होते. लोणच्याच्या बरण्यांना दादरे बांधण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे. सतराव्या शतकाअखेर ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीतर्फे भारतीय रेशीम आणि अन्य सुती कपडे युरोपातल्या देशांत निर्यात केले जाऊ लागले. मात्र त्यापूर्वीपासूनच भारत,चीन, जावा आणि फिलिपिन्समध्ये हा वस्त्र व्यापार नियमित सुरू होता.

Leave a Comment