प्रेमभंगामुळे हृदय भग्न ? तीन महिन्यात होईल दुरूस्त

heart
प्रेमभंग होणे म्हणजे काय काय सोसणे हे फक्त प्रेमभंग झालेलेच सांगू शकतात. अर्थात प्रेमभंगामुळे हृदयाचे हजार तुकडे होणे, झोप न येणे, चेहर्‍यावर मरणकळा येणे, सारखे निश्वास टाकणे, कोणत्याच गोष्टीत लक्ष न लागणे आणि आयुष्याला आता कांही अर्थ राहिला नाही अशी भावना प्रबळ होणे ही प्रेमभंग झालेल्यांची सर्वसाधारण लक्षणे. अर्थात बाकी लोकांसाठी ही मुर्खांची लक्षणे आणि टिंगलटवाळीचा विषय. पण खरोखरच प्रेमभंग झालेले दीर्घकाळ त्याच भावनेत राहतात काय याचे उत्तर मात्र नाही असे आहे.

आयुष्याचा अर्थ संपला असे समजणारे बहुतेक प्रेमभंगवीर तीन महिन्यात पुन्हा पूर्वपदावर येतात म्हणजे दुसर्‍यांदाही प्रेम करायला सिद्ध होतात असे नुकतेच एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. ब्रिटनमध्ये १८ वयोगटावरील महिला आणि पुरूषांत हे सर्वेक्षण केले गेले. त्यात अनेकांनी पहिला प्रेमभंग खूप नवीन शिकविणारा ठरल्याचे सांगितले. काही जणांनी आपल्या ध्येयाकडे अधिक लक्ष देऊ लागल्याचे, कांही जणांनी झाले ते चांगलेच झाले अशाही प्रतिक्रिया दिल्या. प्रेमभंगामुळे उद्धस्त होणार्‍यांपेक्षा त्यातून सावरणार्‍यांची संख्या खूपच अधिक होती.

या सर्वेक्षणातून असेही आढळले की प्रेमभंगाच्या घटना नाताळ आणि नवीन वर्षात अधिक होतात. नाताळचा ताण आणि नवीन वर्षात कांही नवीन सुरू करण्याची माणसाची मनीषा यामुळे या घटना जास्त प्रमाणात घडतात. जर्नल ऑफ पॉझिटिव्ह सायकॉलॉजी मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Comment