दुधी भोपळ्याची बर्फी

dudhi
साहित्य- १ वाटी खिसलेला दुधी, १ वाटी खवा, पाऊण वाटी साखर, १ चमचा लोणी, हवा असल्यास हिरवा रंग आणि वेलदोडा पूड
कृती- दुधी भोपळा धुवून त्याची साल काढावी आणि नंतर खिसणीवर किसून १ वाटी किस घ्यावा. किस पिळून पाणी काढून टाकावे. जाड बुडाच्या पातेल्यात लोणी गरम करावे आणि त्यावर किस घालून परतावा. एक वाफ आल्यावर अगदी थोडेसे पाणी घालून किस शिजू द्यावा. शिजल्यावर त्यात साखर घालून हलवावे आणि हे मिश्रण साधारण घट्ट होईपर्यंत शिजवावे. नंतर त्यात खवा घालून हलवावे आणि हे मिश्रण पातेल्याच्या कडेने सुटू लागेपर्यंत शिजवावे. सतत हलवावे म्हणजे खाली लागणार नाही. पातेल्याच्या कडेने मिश्रण सुटू लागले की गॅसवरून खाली उतरवावे आणि त्यात वेलदोडा पूड व आवडत असल्यास हिरवा रंग घालून हलवावे. चांगले घोटावे.

एका थाळीला अथवा ट्रेला तुपाचा हात लावावा. त्यावर हे मिश्रण घालून एकसारखे थापावे आणि गार झाल्यानंतर त्याच्या वड्या कापाव्यात.

Leave a Comment