जन्मवेळच्या पोशाखात धावून मिलिंद सोमणने साजरा केला ५५ वा वाढदिवस

फिटनेस फ्रिक आणि फिटनेस बाबत अनेकांचा आदर्श असलेला अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण याने त्याचा ५५ वा वाढदिवस गोवा येथे ४ नोव्हेंबरला साजरा केला. या वर्षीही त्याने वाढदिवस साजरा करताना वेगळाच फंडा वापरला. मिलिंदने या निमित्ताने जन्मवेळच्या पोशाखात म्हणजे चक्क विवस्त्र होऊन समुद्र किनाऱ्यावर १२ किमी धावण्याचा विक्रम केला. या वेळचे त्याचे फोटो त्याची पत्नी अंकिता कंवर हिनेच घेतले आणि मिलिंदने ते इन्स्टाग्रामवर शेअर करताना स्वतःलाच वाढदिवस शुभेच्छा दिल्या आहेत. पत्नी अंकिता हिनेही त्याला वाढदिवस शुभेच्छा दिल्या असून सोशल मीडियावर त्यांनतर मिम्सचा जणू पूर आला आहे.

मिलिंद धावपटू आहे पण आठवड्यातून तो तीन ते चार दिवस धावतो. वयाच्या नवव्या वर्षी तो राष्ट्रीय जलतरण चँपियन होता आणि त्यानंतर २३ वर्षापर्यंत तो स्वीमिंग क्षेत्रात होता. त्यानंतर ३७ व्या वर्षापर्यंत तो कोणताही विशेष व्यायाम करत नव्हता. त्याला मॉडेलिंग मध्ये करियर करायचे होते त्यामुळे या काळात आलेल्या चित्रपटाच्या अनेक ऑफर्स त्याने नाकारल्या होत्या. त्याची मधू सप्रे सोबत केलेली एका बुटाची न्यूड जाहिरात प्रचंड वादग्रस्त ठरली होती. त्याने अनेक चित्रपटातून भूमिका केल्या आहेत.

मिलिंद नेहमीच हटके काही तरी करतो. त्याने त्याच्यापेक्षा ३२ वर्षाने लहान असलेल्या अंकिता सोबत विवाह केला असून त्यानंतर सहा महिने त्याचा हनिमून सुरु होता. या काळात ते अनेक देशात गेले. आजही हे दोघे एक सारख्या कपड्यात धावताना अनेकदा दिसतात. २०१२ मध्ये दिल्ली ते मुंबई हे १५०० किमी अंतर ३० दिवसात धावून त्याने लिम्का बुक मध्ये या विक्रमाची नोंद केलेली आहे.