चेन्नईतील अनोखे कैदी किचन

kaidi
कोणाला कधी तुरूंग वारी करण्याची वेळ येईल हे सांगता येणे कठीण असले तरी प्रत्येकाला तुरूंगात जावेच लागेल असेही नाही. कुणाला तुरूंगात कसे वाटते याचा अनुभव घ्यावासा वाटला तर चेन्नईतील मायलापोर येथील कैदी किचन रेस्टॉरंटला जरूर भेट द्या. अर्थात येथे तुरूंगातील यातनांच्या ऐवजी अतिशय चविष्ट जेवणाचा आस्वाद घेण्याची संधीही त्यामुळे मिळू शकणार आहे.

तब्बल ८ हजार चौरस फुटात विस्तारलेले हे रेस्टॉरंट पूर्णपणे वातानुकुलीत आहे. मात्र याची सजावट अगदी तुरूंगासारखी आहे. येथे स्वागत करण्यासाठी पोलिसांच्या वेशातील वेटर आहेत. तुमच्या खाद्यपदार्थांची ऑर्डरही तेच घेतात. मात्र कैद्यांच्या वेशातील वेटर ती सर्व्ह करतात. स्वयंपाकाचे कामही कैद्याच्या वेषातील कर्मचारीच करतात. अंतर्गत सजावटीत तुरूंगातील सेलप्रमाणेच येथे आठ मोठे सेल उभारले गेले आहेत. बसायच्या खुर्च्या पोलिस स्टेशनमधील खुर्च्यांसारख्याच आहेत. या सेलमध्ये ग्राहकांना बंद केले जाते आणि नंतर जेवण सर्व्ह केले जाते.

या अनोख्या रेस्टॉरंटचे मालक रोहित ओझा सांगतात आमचे रेस्टॉरंट पूर्णपणे शाकाहारी आहे. तसेच येथे बार नाही. तुरूंगातील वास्तव्याचा आनंद ग्राहकांना देणे हा त्यामागचा हेतू नाही तर नागरिकांना कायद्याचे महत्त्व कळावे आणि त्यांनी अपराधांपासून दूर रहावे असा त्यामागे हेतू आहे.

Leave a Comment