काश्मीर निवडणुक, ७० वर्षानंतर निर्वासिताना मतदान अधिकार

फोटो साभार इंडिया डॉट कॉम

जम्मू काश्मीर मध्ये ७० वर्षानंतर प्रथमच पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. आता हे रहिवासी जिल्हा पंचायत पातळीवरील मतदानात तसेच विधानसभा मतदानात सहभागी होऊ शकणार आहेत. राज्याचे निवडणूक आयुक्त के.के. शर्मा यांनी या संदर्भातील घोषणा केल्यावर या समुदायात आनंदाचे वातावरण आहे. जिल्हा पातळीवरील या निवडणुका आठ टप्प्यात होणार आहेत. त्यासाठी या निर्वासितांना मतदार यादीत नावनोंदणी करायचे आवाहन केले गेले आहे.

फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेली सुमारे २२५०० कुटुंबे जम्मू काश्मीर मध्ये रहात आहेत पण विशेष कलम ३७० मुळे त्यांना विधानसभा आणि जिल्हा पातळीवरील तसेच पंचायत निवडणुकात मतदान करण्याचा अधिकार नव्हता. मात्र लोकसभेसाठी ते मतदान करू शकत होते. केंद्राने काश्मीरसाठीचे विशेष ३७० कलम रद्द केल्यानंतर त्यांना आता सर्व निवडणुकात मतदान करण्याचा हक्क मिळाला आहे. निर्वासित संघटनेचे अध्यक्ष लब्बा राम गांधी म्हणाले गेली ७० वर्षे आम्हाला या दिवसाची प्रतीक्षा होती. आम्हाला अधिकृत नागरिकत्व मिळणार यामुळे खूप आनंद आहे. काश्मीर मध्ये असे दीड लाखापेक्षा जास्त निर्वासित असून त्यातील १ लाख मतदार आहेत. यातील अनेकांचा जन्म भारतात झाला आहे. पण त्यांना भारताचे अधिकृत नागरिकत्व नव्हते.