ओला उभारणार जगातील सर्वात मोठा ई स्कुटर प्लांट

स्वदेशी टॅक्सी रायडिंग सेवा देणारी ओला कॅब्स आता इलेक्ट्रिक स्कुटर उत्पादन प्रकल्प सुरु करण्याच्या प्रयत्नात असून हा जगातील सर्वात मोठा ई स्कुटर प्रकल्प असेल असे सांगितले जात आहे. त्यासाठी ओला १०० एकर जमिनीच्या शोधात आहे आणि चार राज्यांशी त्या संदर्भात चर्चा करत आहे. भावेश अग्रवाल आणि अंकित भाटी यांच्या ओलाने अल्पावधीत व्यवसायात चांगला जम बसविला आहे.

आजच्या घडीला जगातील सर्वात मोठा स्कुटर प्रकल्प जपानच्या होंडा कंपनीने गुजराथ येथे स्थापन केला आहे. तेथे वर्षाला १२ लाख वाहने तयार केली जातात. ओलामध्ये हुंदाईने गुंतवणूक केली आहे. ओला वर्षाला २० लाख ई स्कुटर उत्पादन करण्याच्या योजना आखत आहे. भारतात त्यासाठी दक्षिण भारतातील तीन राज्ये आणि पश्चिम भारतातील एका राज्याबरोबर जागेसंदर्भात बोलणी सुरु आहेत.

ओलाने नुकतीच नेदरलँड्समधील अॅप स्कुटरचा इलेक्ट्रिक ब्रांड एटर्गो खरेदी केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारे ई स्कुटर प्रकल्पासाठी अनुदान देत आहे. शिवाय ई स्कुटर ग्राहकांना आयकरात दीड लाखाची सुट देत आहे. पेट्रोलवरचे अवलंबित्व कमी व्हावे आणि प्रदूषण पातळी नियंत्रणात राहावी यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे.