अॅपल वर बहिष्काराचे आवाहन करणारे ट्रम्प वापरतात दोन आयफोन

फोटो साभार अमर उजाला

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे डोनल्ड ट्रम्प याच्या हातातून सुटणार अशी चिन्हे दिसू लागली असताना ट्रम्प यांच्या विक्षिप्तपणाच्या कथा चर्चिल्या जाऊ लागल्या आहेत. जगातील महासत्तेचे अध्यक्षपद भूषविणारे ट्रम्प नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत. ट्विटरने अनेकवेळा त्यांची विधाने दिशाभूल करणारी किंवा चुकीची ठरवून ब्लॉक केली आहेत. ज्या ट्विटर बरोबर ट्रम्प यांचा ३६ चा आकडा आहे त्याच ट्विटरवर ट्विट करण्यासाठी ट्रम्प खास स्वतंत्र फोन वापरतात आणि तो आयफोन आहे.

विशेष म्हणजे २०१५ मध्ये बर्नाडीनो शुटींग प्रकरणात सापडलेला दहशतवाद्याचा आयफोन अनलॉक करण्यास नकार दिल्यावर ट्रम्प यांनी ट्विटर वरून अमेरिकन नागरिकांना अॅपल आयफोन वापरू नयेत असे आवाहन केले होते. २०१६ मध्ये त्यांनी अॅपल वर बहिष्कार घातला होता. पण आता मात्र ट्रम्प स्वतः दोन आयफोन वापरतात. त्यातील एक खास ट्विट करण्यासाठी आणि दुसरा मेसेजिंग, कॉलिंगसाठी वापरला जातो. २०१७ पर्यंत ते अँड्राईड फोन वापरत होते असे पोलिटीकोच्या २०१८ च्या अहवालात नमूद केले गेले आहे.

सुरक्षा कारणास्तव ट्रम्प यांनी प्रत्येक ३० दिवसानंतर फोन बदलणे अपेक्षित आहे मात्र ट्रम्प हा नियम पाळत नाहीत. माजी अध्यक्ष ओबामा आणि मिशेल दर महिन्याला फोन तपासणी करून घेत असत. अर्थात ट्रम्प यांचा फोन नंबर दर महिन्याला बदलला जातो असे समजते. अमेरिकेच्या अध्यक्षाने फोन वापरताना कॅमेरा, मायक्रोफोन वापरण्यास बंदी आहे त्यांना जीपीएस सपोर्ट घेता येत नाही. मात्र ट्रम्प यांनी हे सगळे नियम रद्द केले आहेत. पूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष फक्त ब्लॅकबेरीचे फोन वापरत असत पण ही कंपनी बंद झाल्यामुळे आयफोन वापरले जात आहेत.