राष्ट्राध्यक्ष निवडणूक; आतापर्यंत 22 पैकी 12 राज्यात ट्रम्प यांचा विजय


वॉशिंग्टन : अमेरिकेत नवीन राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतगणना सुरु असून आतापर्यंत 50 पैकी 22 राज्यांचे निकाल हाती आले आहेत. त्यानुसार ट्रम्प 12 राज्यांमध्ये तर बायडन यांनी 10 राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर डेमोक्रेटचे उमेदवार बायडन हे इलेक्टोरल मतदानामध्ये ट्रम्प यांच्या पुढे आहेत. आतापर्यंत जो बायडन यांना 129 तर ट्रम्प यांना 94 इलेक्टोरल मते मिळाली आहेत. अमेरिकेत एकूण इलेक्टर्सची संख्या 538 आहे आणि बहुमतासाठी 270 चा आकडा गाठायचा आहे. मतगणनेच्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत नवी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा बाजी मारणार की डेमोक्रेटचे जो बिडेन जिंकणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यातच ट्रम्प यांनी ट्विट करत आपणच जिंकणार असल्याचा दावा केला आहे.

ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नागरिकां प्रति आभार व्यक्त करत ट्विट केले आहे की, संपूर्ण देशात आम्ही चांगल्या स्थितीत आहोत. अमेरिकत मतदान सुरु आहे. सर्वांनी मतदान करावे. माझ्यासाठी जिंकणे सोपे आहे, पण पराभव पचवणे कठिण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, त्यांच्या सरकारच्या काळात अमेरिकेची अर्थव्यवस्था 33.1 टक्क्यांनी सर्वात वेगाने वाढली आहे. ते म्हणाले की, अमेरिकेच्या इतिहासात पुढील वर्ष सर्वात महान इकॉनॉमी वर्ष असेल.

अमेरिकेत यंदा राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पदासाठी विक्रमी मतदान झाले आहे. तेथील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील ओरेगन हे पाचवे राज्य आहे, तिथे 2016 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदान झाले आहे. यावेळी 10 कोटी अमेरिकन नागरिकांनी निवडणुकीआधीच पोस्टल मतदानाद्वारे आपले मत दिले होते. यामुळे यंदा विक्रमी मतदान झाल्याचा अंदाज आहे.