अर्णब गोस्वामींच्या अटकेवरुन केशव उपाध्ये यांचा सुप्रिया सुळेंना टोला


मुंबई – वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली आहे. अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील राहत्या घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आली. कोणतीही कागदपत्रे, न्यायालयाचा आदेश किंवा समन्स नसतानाही पोलिसांनी ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे.


यावरून आता भाजप व राज्य सरकारमध्ये आरोपप्रत्यारोपाचे सत्र सुरु झाले असून यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. विरोधात टीका करणाऱ्या चॅनेल्सवर अशी घरात घुसून कारवाई. विरोधी विचार दडपून टाकायचा हा प्रयत्न, सुप्रिया सुळे यालाच आणिबाणी म्हणतात तेही राष्ट्रवादीचा गृहमंत्री असलेल्या राज्यात घडतंय, असे ट्विटद्वारे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटेकचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

कांजूर कारशेडच्या जागेवरुन सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर मोदी सरकार हळूहळू देशात आणीबाणी आणू पाहत असल्याचे चित्र असे म्हणत टीका केली होती, आता केशव उपाध्ये यांनी त्यांच्या या वक्तव्यावरून निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी कांजूरमार्ग कारशेडच्या जागेवर केंद्र सरकारने केलेला दावा धक्कादायक असल्याचे म्हटले होते. कांजूरमार्ग येथील कारशेडसाठीची जमीन ही महाराष्ट्र सरकारची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते त्याच राज्याचा त्या जमिनीवर पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार सातत्याने राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे काम करत असल्याचेही सुप्रिया सुळेंनी म्हटले होते.