व्यवसाय मार्गदर्शन

guide
अलीकडच्या काळात चांगली संधी असणारा हा एक उत्तम बिनभांडवली स्वयंरोजगार आहे. पूर्वीच्या काळी या व्यवसायाला म्हणावी तेवढी संधी नव्हती. कारण कोणते शिक्षण घ्यावे याबाबत विद्यार्थी आणि त्यांचे पालक म्हणावे तेवढे जागरूक नव्हते. शिवाय शिक्षणाच्या संधीही फारशा उपलब्ध नव्हत्या. निरनिराळ्या प्रकारचे अभ्यासक्रम अजून म्हणावे त्या प्रमाणात उपलब्धही नव्हते. आपल्या गावाच्या जवळ उपलब्ध असलेल्या महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य किंवा विज्ञान यातल्या कुठल्या तरी शाखेत प्रवेश घेऊन कशीबशी पदवी घेऊन कुठे तरी कारकुनी छापाची नोकरी मिळवावी किंवा शिक्षक व्हावे एवढेच काय ते व्यवसाय मार्गदर्शन उपलब्ध होते. परंतु जस जसे उद्योगाचे क्षेत्र वाढत चालले तस तसे नवनवे अभ्यासक्रम निघायला लागले आणि चांगल्या नोकर्‍या मिळवायच्या असतील तर आपल्याला एखादा असाच उपयुक्त अभ्यासक्रम पुरा केला पाहिजे हे मुलांच्याही लक्षात यायला लागले आणि पालकांनाही त्याचे महत्व कळायला लागले. मात्र शिक्षणाच्या संधी प्रचंड प्रमाणावर उपलब्ध झाल्यामुळे नेमके कोणते शिक्षण घ्यावे याबाबत मुलांच्या मनात संभ्रम निर्माण व्हायला लागला आणि त्यामुळेच व्यवसाय मार्गदर्शन हा नवीन व्यवसाय उदयाला आला. विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सगळ्याच अभ्यासक्रमांची माहिती उपलब्ध होऊ शकत नाही. याबाबतीत कोणी तरी नेमकी माहिती देणारे हवे असते. आपल्या देशात आणि विशेषत: राज्यात उपलब्ध असलेल्या अनेक अभ्यासक्रमांची माहिती गोळा करून तिचे व्यवस्थित वर्गीकरण करून ती माहिती पालकांना आणि मुलांना देण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यांची ही गरज भागू शकते. हा व्यवसाय करण्यासाठी एखादे कार्यालय काढणे किंवा मोठी गुंतवणूक करून संस्था उभी करणे आवश्यकच आहे असे नाही. आपण आपल्या घरावर एक साधा बोर्ड लावून तिथे हा व्यवसाय सुरू करू शकतो. यासाठी आवश्यक असलेली माहिती आपल्याला जमा करावी लागेल. ती फार अवघड नाही. विविध दैनिकांचे आणि साप्ताहिकांचे व्यवसाय मार्गदर्शनपर विशेषांक निघत असतात. ते विशेषांक आवर्जून खरेदी करावे आणि त्यातली माहिती वर्गीकरण करून व्यवस्थित जतन करून ठेवावी. इंडिया टुडे, आऊटलूक आणि द वीक ही इंग्रजी साप्ताहिके दर सहा महिन्याला एकदा विशेषांक प्रसिद्ध करतात. त्या विशेषांकाचे नावच द बेस्ट बी स्कूल ऑफ इंडिया, द बेस्ट युनिव्हर्सिटीज ऑफ इंडिया किंवा द बेस्ट कॉलेजेस् ऑफ इंडिया असे असते. अशा विशेषांकामध्ये विविध विद्या शाखा, त्यांचे शिक्षण देणार्‍या संस्था, या शिक्षणाला असलेले व्यावसायिक मूल्य या सर्वांची माहिती दिलेली असते. ती माहिती नीट वाचून काढली, समजून घेतली तर आपण त्या संबंधात इतरांना मार्गदर्शन करू शकतो. केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयातर्फे रोजगार वार्ता असे एक पाक्षिक निघते. तेही आपण आपल्याकडे ठेवले पाहिजे. त्याशिवाय अनेक प्रकारचे अभ्यासक्रम चालविणार्‍या शिक्षण संस्थांची माहितीपत्रके हस्तगत करून त्यांच्या फायली केल्या पाहिजेत. विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांची माहिती इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध असते. ती माहिती संकलित करून त्यांचे प्रिंटस् काढून त्यांच्या फायली तयार करून ठेवल्या तर तीही फाईल व्यवसाय मार्गदर्शनाच्यादृष्टीने उपयुक्त ठरते. आपल्या घरी येऊन उच्च शिक्षणाबाबत कोणी सल्ला विचारला तर ठराविक शुल्क घेऊन आपण त्यांना ती माहिती उपलब्ध करून देऊ शकतो. त्यातून त्यांनाही मार्गदर्शन मिळते आणि आपल्यालाही व्यवसाय म्हणून चार पैसे मिळतात. असे असले तरी व्यवसाय मार्गदर्शन केंद्रात जाऊन पैसे देऊन व्यक्तिगतरित्या माहिती मिळविण्याची प्रवृत्ती आपल्या समाजात म्हणावी तेवढी वाढलेली नाही. त्यावर उपाय म्हणून आपल्या व्यवसाय मार्गदर्शन केंद्रातर्फे आपण कमी शुल्क आकारून व्यवसाय मार्गदर्शन शिबीर घेऊ शकतो. त्यातून आपल्याला प्राप्ती होऊ शकते. आपल्या समाजामध्ये अजूनही काही ठराविक अभ्यासक्रमांकडेच मुलांचा ओढा असतो. आगामी काळाची गरज ओळखून काही नवनवे अभ्यासक्रम करावेत किंवा फारसी प्रसिद्धी नसलेले पण उत्तम नोकरी देऊ शकणारे अभ्यासक्रम शोधून काढावेत असा त्यांचा प्रयत्न नसतो. मात्र असे किती तरी अभ्यासक्रम असतात की, जे लोकांना माहीत नाही पण उत्तम नोकर्‍या मिळवून देऊ शकतात. अशा अभ्यासक्रमांचे पत्ते, त्यांच्या महाविद्यालयाची ठिकाणे, अभ्यासक्रमाचा कालावधी, त्या महाविद्यालयातल्या सोयी, फी, राहण्याची व्यवस्था या सगळ्यांची माहिती मिळवून आपण आपल्या ग्राहकाला देऊ शकतो. ही एक मोठी समाजसेवा आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांचे पत्ते देतानाच आपण आणखीही एक सेवा या व्यवसायाला जोडू शकतो. ती सेवा म्हणजे आपल्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांचा मानसिक कल ओळखून त्यांना योग्य होईल असा अभ्यासक्रम सुचविणे. बर्‍याच वेळा मुले अभ्यासक्रमांची निवड करताना भावनेच्या आहारी जाऊन तो निवडतात किंवा वाहवत जातात. आपले मित्र तो अभ्यासक्रम करतात म्हणून आपणही केला पाहिजे असा चुकीचा निर्णय घेतात. त्यांना समजावून सांगून योग्य तो अभ्यासक्रम सुचविला पाहिजे. यातून आपण अनेकांचे जीवन उज्ज्वल करू शकतो. अशा प्रकारचे व्यवसाय करणारे अनेक लोक समाजात आहेत सुद्धा. मात्र अनेक शहरांमध्ये असे लोक नाहीत. ती उणीव आपण भरून काढली पाहिजे.

Leave a Comment