मुलाखतीला जातानाचा पेहराव

interview
नोकरीसाठी मुलाखतीचे बोलावणे येते तेव्हा मुलाखतीला जाताना आपण कपडे कोणते घालावेत असे प्रश्‍न प्रत्येकाला पडलेला असतो. कारण माणसाची पारख आणि निवड होण्यात कपड्याचा मोठा हिस्सा असतो आणि मुलाखतीचे तंत्र शिकविणारे लोक कपड्याबाबत बरेच काही सांगत असतात. मुलाखत देणारा उमेदवार मुलाखतीच्या चेंबरमध्ये प्रवेश करतो तेव्हा निवड समितीचे लक्ष अभावितपणेच त्याच्या कपड्याकडे जाते आणि त्याचा पहिला प्रभाव कपड्यावरून पडतो.

फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन या तत्वानुसार त्याचा पहिला प्रभाव कपड्यांवरून पडणार असेल तर त्याचा कायमचा प्रभावही त्यावरच अवलंबून राहील हे तर नक्कीच आहे. मात्र या प्रभावासाठी कोणी फार सजून धजून किंवा नटून थटून जात असेल तर ते मात्र विपरित ठरेल. आपण नेहमी घालतो तेच कपडे घातले पाहिजेत. पण प्रभाव पडावा म्हणून कोणी वेगळेच कपडे घालून जात असेल तर त्या कपड्यामुळे येणारे अवघडलेपण क्षणोक्षणी लक्षात येईल.

आपण आयुष्यात कधीच कोट वापरत नसू, पण केवळ मुलाखतीसाठी मित्राचा मागून आणलेला कोट घातला असेल तर ते निवड समितीच्या लक्षातही येते आणि आपल्याही हालचाली विचित्र होतात. तेव्हा आपला नेहमीचाच ड्रेस, पण चांगला इस्त्री करून घालून जावे. इंटरव्ह्यूसाठी म्हणून दागिने घालू नयेत. तेही विचित्र दिसते.

स्वच्छ आणि इस्त्री केलेले कपडे घातल्याने आपण शिस्तप्रिय आणि नेटके आहोत हे लक्षात येत असते. मात्र कपड्यांचा रंग निवडताना न्यूट्रल कलरचे कपडे टाळावेत. काळे किंवा फार भुरकट कपडे असू नयेत. पादत्राणे घालताना सुद्धा सॅन्डल किंवा चप्पल घालू नये. काळे शूज घालून जाणे जास्त श्रेयस्कर असते. जॉगिंग शूज टाळावेत. शर्टाची बटणे फार उघडी ठेवू नयेत. फार भपकेदार सेंट फवारलेला असू नयेत. गॉगल, सन् ग्लासेस, भरपूर सजावट केलेले पट्टे अशा प्रकारची सजावट सुद्धा टाळावी. कपड्यावरून निवड होत नाही, परंतु कपडे हा एक जरूरी भाग आहे हे लक्षात ठेवावे.

Leave a Comment