मजबूत हृदयासाठी अष्टसूत्री

heart
निरोगी आयुष्यासाठी हृदय मजबूत असण्याची गरज असते. मात्र बैठी कामे, जंगफूड, मद्यपान, धूम्रपान, जादा काम आणि जादा ताण यांनी हृदयाचे स्नायू दुबळे होतात हे टाळण्यासाठी खालील आठ गोष्टी आवश्यक आहेत.

१) मद्यपानाचा त्याग करा – केवळ हृदयाच्या आरोग्या साठीच नव्हे तर एकंदरीतच चांगले आणि प्रदीर्घ जीवन जगण्यासाठी मद्यपान टाळले पाहिजे. मद्यपान करणारी व्यक्ती हृदय विकाराने मरण्याची शक्यता जास्त असते. मद्यपान सोडून दिले की, ही जोखीम कमी होते. २) मीठ कमी करा – मिठामुळे उच्च रक्तदाब वाढतो. त्यामुळे मीठ शक्यतो कमी खाल्ले पाहिजे. बटाटा चिप्स्, खारे दाणे, मसाला काजू आणि भरपूर मीठ घालून प्रिझर्व्हवर केलेले तयार खाद्य पदार्थ यात मीठ खूप असते. हे पदार्थ टाळले पाहिजेत.

३) आरोग्यदायी आहार – हृदयाची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि निरनिराळे हृदयविकार टाळण्यासाठी खाणे आरोग्यदायी असले पाहिजे. खाण्यात फळे आणि भाज्या खूप असल्या पाहिजेत. अशा खाण्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होतेच, पण हृदयावरच्या शस्त्रक्रियेनंतर परिस्थिती पूर्ववत होण्यासही मदत होते. या आरोग्यदायी खाण्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटस् असलेली तेले (खोबरेल आणि पामतेल) तसेच साखर टाळली पाहिजे. मैद्यापासून केलेले बिस्किट, केक हे पदार्थही वर्ज्य केले पाहिजेत.

४) मद्यपानात घट – मद्यपानाच्या रुपाने शरीरात जाणारे अल्कोहोल हृदयाच्या स्नायूंवर दुष्परिणाम करते. मद्य रक्तदाब वाढवते आणि वजनही वाढवते. अतीमद्यपानामुळे कोणत्याही क्षणी हृदय विकारचा झटका येण्याची भीती असते. ५) कार्यरत रहा – हृदय मजबूत होण्यासाठी सतत कार्यरत राहिले पाहिजे आणि शारीरिक हालचाली वाढवल्या पाहिजेत. दिवसातून किमान ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे. कार्यरत राहण्याने आणि व्यायामाने शरीराबरोबर मनाचेही आरोग्य चांगले राहते.

६) वजन नियंत्रणात ठेवा – वजन मर्यादेच्या बाहेर वाढले की, आरोग्याचे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. मधुमेह होतो आणि त्यातून पुढे आरोग्याच्या गुंतागुंती निर्माण होतात. कारण वजन वाढण्याने शरीरातील कोलेस्टेरॉल वाढते. ७) नियमित तपासणी – ब्लड प्रेशर, शुगर आणि कोलेस्टेरॉल यांची आपल्या रक्तातली पातळी सतत तपासत राहिले पाहिजे. सातत्याने रक्तदाब असणारी व्यक्ती दीर्घ आयुष्य जगू शकत नाही. ८) ताण तणाव – मर्यादेपेक्षा अधिक ताण-तणाव प्रकृतीला हानीकारक असतात. शारीरिक आणि मानसिक दोन्ही तणाव वाढू नयेत यासाठी काही काळज़ी घेण्याची गरज असते. प्रदीर्घकाळ केल्या जाणार्‍या कामांमध्ये अधूनमधून विश्रांती घेणे यादृष्टीने गरजेचे असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment