कात्रण सेवा आणि डॉक्युमेंटेशन

paper
कात्रण सेवा म्हणजे कशाचा तरी कातरा करणे किंवा काही तरी कातरण्याची सेवा असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. परंतु असा कातरा विकण्याचा सुद्धा एक व्यवसाय आहे. कदाचित लोकांना त्याची कल्पना नाही. परंतु महाराष्ट्राच्या ज्या भागातून फळबागायती मोठ्या प्रमाणावर केली जाते त्या भागातील शेतकर्‍यांना फळांचे पॅकिंग करताना कार्टनमध्ये खालच्या बाजूला रद्दी कागदाचा कातरा टाकावा लागतो आणि हा कातरा मिळत नाही. रद्दी कागद मिळतो, परंतु त्या कागदाचा पॅकिंगला उपयोगी पडेल असा कातरा करणे त्यांना जमत नाही. तो करून कोणी दिला तर ते लोक चांगले पैसे देऊन तो विकत घेतात. द्राक्ष, डाळिंब, स्टॉबेरी, पेरू अशा अनेक फळांच्या उत्पादकांना हा कातरा हवा असतो. या शेतकर्‍यांना पॅकिंगसाठी आवश्यक असलेली खोके किंवा कार्टन विकणारे कारखानदार आपल्याला या शेतकर्‍यांचे पत्ते देऊ शकतात. त्यांच्यांशी संपर्क साधून आपण आपला कातरा विकू शकतो. पण मला या प्रकरणात या कातर्‍याची माहिती द्यायची नसून वर्तमानपत्रात छापून येणार्‍या बातम्यांच्या कात्रणांची माहिती द्यायची आहे. वर्तमानपत्राची कात्रणे काढणे आणि त्या बातम्या ज्या संस्थेच्या किंवा व्यक्तीच्या असतील त्यांना त्या कात्रणांचा संग्रह पुरवणे हा एक चांगला व्यवसाय आहे. समाजात प्रसिद्धीची आवड असणार्‍या लोकांची संख्या वाढत चालली आहे. सामाजिक कार्य करणारे अनेक लोक, संस्था आणि नेते यांना आपल्या बातम्या कुठे छापून आलेल्या आहेत याची विलक्षण उत्सुकता असते. परंतु सगळ्याच वर्तमानपत्रातल्या बातम्या ते बघू शकत नाहीत. एखाद्या तरुण मुुलाने रोज सगळी वर्तमानपत्रे वाचून त्यातल्या बातम्यांची कात्रणे काढली आणि ती एका कागदावर व्यवस्थित चिटकवून, त्या कागदांची फाईल तयार करून महिन्याला एकदा त्या व्यक्तीला किंवा संस्थेला सादर केली तर त्याचे चांगले पैसे मिळू शकतात. आजच्या काळात विविध प्रकारच्या निवडणुकांत तिकिटे मागणार्‍या पुढार्‍यांची संख्या वाढली आहे. अशा लोकांना तिकिटांची मागणी करताना पक्षाच्या निवडणूक मंडळासमोर आपण केलेल्या कामाचा आढावा सादर करावा लागतो. अशा लोकांना अशावेळी या कात्रणांची फाईल उपयोगी पडते. समाजात अशा हौशी नेत्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांना ही सेवा प्रदान करून आपण चांगला उद्योग करू शकतो.

या उद्योगामध्ये आणखी सुधारणाही करता येते. अशीच फाईल एखाद्या शिक्षण संस्थेला, स्वयंसेवी संघटनेला किंवा राजकीय पक्षाला सुद्धा देता येते आणि त्यातूनही अर्थप्राप्ती होते. मात्र याच्या पलीकडे जाऊन थोडे डोके लढवले तर हीच कात्रण सेवा व्यापक करता येते. पुण्यातल्या एका व्यावसायिकाने या सेवेला असे व्यापक रूप दिले होते. त्याने पुण्यातल्या प्रत्येक प्रभागाची कात्रणे कापून त्यांच्या प्रभागनिहाय फायली तयार केल्या होत्या. महानगर पालिकेची निवडणूक लागली तेव्हा त्याने आपल्या या फायलींची जाहिरात केली आणि निवडणूक लढविणार्‍या अनेक उमेदवारांच्या रांगा लागल्या. एका विशिष्ट प्रभागामधून महापालिकेची निवडणूक लढविणारा उमेदवार त्या प्रभागातल्या समस्यांविषयी अनभिज्ञ असतो. परंतु त्याला त्या समस्यांची माहिती झाली तर तो त्या माहितीचा वापर आपल्या प्रचारात करू शकतो. म्हणजे आपण अक्कलहुशारीने केलेली फाईल त्या उमेदवाराला निवडणुकीत उपयोगी पडते. आताच्या काळामध्ये निवडणुकांवर उमेदवारांचा लाखोच नव्हे तर करोडो रुपयांचा खर्च होत आहे. त्यामुळे आपल्या प्रचाराचे महत्वपूर्ण रॉ मटेरियल ठरणारी ही फाईल तो चांगली किंमत देऊन विकत घेऊ शकतो. तेव्हा आपण जी वर्तमानपत्रे वाचून फेकून देतो त्याच वर्तमानपत्रातून असा एक चांगला व्यवसाय उभा करता येतो.

हीच सेवा आणखी व्यापक करता येते. एखाद्या नेत्याची केवळ कात्रणाचीच फाईल न करता त्याच्या आयुष्याचे डॉक्युमेंटेशन करता येते. त्या व्यक्तीच्या प्रत्येक कार्यक्रमाची व्हिडिओ कॅसेट किंवा सीडी तयार करून त्याचे पूर्ण कार्य सीडीबद्ध करून देता येते. अशा प्रकारे आपले आयुष्य सीडीबद्ध करण्याची हौस बर्‍याच लोकांत वाढत आहे. मात्र त्यासाठी आपल्याला खूप काम करावे लागते आणि त्याच्या सर्व कार्यक्रमाला हजर रहावे लागते. शिवाय त्याच्या पूवर्र् आयुष्यातल्या ठिकाणांची शुटींग करून आणता येते. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीची डॉक्युमेंटरी तयार करणे हे अव्याहतपणे चालणारे काम असते आणि त्यातून आपला एक नवा बिनभांडवली उद्योग उभा रहात असतो. अशा प्रकारची डॉक्युमेंटरी संस्थांचीही करता येते. प्रसिद्धीची हौस आणि आपले जीवन चरित्र चिरंतन टिकावे अशी लोकांची वाढत चाललेली इच्छा यातून आपण हे उद्योग उभे करू शकतो. ही कामे करणार्‍या लोकांना संघटित करणे आणि त्यांच्यात चांगला समन्वय घडवणे हेच केवळ आपले काम असेल. आपला पैसा या उद्योगात गुंतणार नाही. आपण ज्यांची डॉक्युमेंटरी करू त्यांना आपल्या कामाची खात्री पटली तर नकळतपणे आपल्याकडे त्यांची जनसंपकार्ची कामे यायला लागतात आणि तिथून आपला व्यवसाय वाढू शकतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की, समाजाचे बदलत जाणारे वातावरण हे आपण जाणले पाहिजे आणि तसे व्यवसाय केले पाहिजे.

Leave a Comment