म्हातारपणची काठी

oldage
समाजाच्या बदलत्या गरजा ओळखून केला जाणारा आणखी एक व्यवसाय म्हणजे वृद्धा दांपत्यांचा केअर टेकर म्हणून काम करणे. सध्याच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाही. लोक वृद्ध झाले तरी मुलांकडे रहायला जात नाहीत आणि आपल्याच घरी एकटे राहतात. काहींना मुलेच नसतात, त्यामुळे त्यांना सांभाळायला कोणी नसते. काही लोकांना मुले असतात पण ती परदेशात रहात असतात. त्यामुळे या वृद्धावस्थेत या लोकांची काळजी कोणी घ्यावी, असा प्रश्‍न पडतो. या लोकांकडे पैसा असतो, पण काळजी घेणारा कोणी नसतो. भाजी आणून देणे, छोट्या-मोठ्या वस्तू दुकानातून आणून देणे, बँकांतली कामे करणे अशा असंख्य कामांसाठी त्यांना कोणी तरी सोबत लागते. अशा एकाकी वृद्ध दांपत्यांचा केअर टेकर म्हणून काम करता येऊ शकते. त्याला काही भांडवल लागत नाही आणि आस्थेने, काळजीने त्यांची कामे केली, त्यांना प्रेमाची वागणूक दिली तर त्यांच्याकडून चांगला मोबदला मिळवता येऊ शकतो. असे किती तरी उद्योग आहेत जे सामाजिक गरजांतून निर्माण झाले आहेत.

जेवणाचे डबे
अशा वृद्धांना जेवणाचे डबे देणे किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे पुरवणे हाही एक कमी भांडवलात करता येणारा आणि भरपूर पैसा देणारा उद्योग आहे. महाराष्ट्रातल्या ज्या ज्या शहरांची वाढ एज्युकेशनल हब म्हणून झालेली आहे तिथे विद्यार्थ्यांना डबे पुरवून अनेक महिला आपल्या संसाराला उत्तम हातभार तर लावत तर आहेतच पण त्यातल्या कित्येक महिलांना हजारो रुपये कमवलेले आहेत.

लोकांच्या घरी जाऊन मसाज करणे हाही एक चांगला व्यवसाय आहे. त्यासाठी मसाज करण्याचे प्रशिक्षण घेतलेले असावे. अशा प्रशिक्षित मसाजिस्टना घरोघरी तर काम करता येईलच, पण ब्यूटी पार्लर, स्पा आणि आयुर्वेदिक डॉक्टरांची पंचकर्म चिकित्सालये, त्याचबरोबर विविध ठिकाणची मसाज केंद्रे, जिम्स् याही ठिकाणी नोकरी न करता व्हिजिटिंग मसाजिस्ट म्हणून काम करता येईल.

अशाच रितीने योग प्रशिक्षक म्हणूनही काम करता येते. योगासनांचे महत्व लोकांना पटत आहे आणि आपले आरोग्य राखण्यासाठी योगासने केली पाहिजेत हे लोकांच्या लक्षात यायला लागले आहे. त्यामुळे योगाचा वर्ग सुरू करून लोकांना योगासने, प्राणायाम, ध्यान शिकवणे हा एक चांगला व्यवसाय ठरत आहे. योग शिक्षकांना परदेशात सुद्धा चांगली मागणी आहे.

Leave a Comment