बिझी मित्रांनो, आरोग्याबाबत काही नियम पाळा

fitness
वजन नियंत्रणात ठेवणे, आरोग्य चांगले ठेवणे या गोष्टी बर्‍याच अवघड असतात असे समजले जाते. काही लोक मात्र आहे त्या वजनाचेच राहतात आणि टुणटुणीत असतात. मग हे लोक असे काय करतात की, ज्यामुळे त्यांचे वजन एका ग्रॅमनेही वाढत नाही आणि त्यांच्या हालचालीत कधी जडपणा येत नाही. खरे म्हणजे स्वत:ला मेंटेन केलेल्या या लोकांनी वजन वाढू नये म्हणून काहीच केलेले नसते. त्यांचे वजन वाढण्याची शक्यताच नसते. त्याची दोन कारणे असतात. भरपूर तेलकट आणि गोड पदार्थ खाल्ले की वजन वाढत असते आणि या लोकांना तसे तेलकट आणि गोड पदार्थ खायलाच मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वजनाचा फारसा प्रश्‍न येत नाही. त्यांचे वजन आपोआपच नियंत्रणात राहते.

अशा लोकांची दिनचर्या ठरलेली असते. ते कोणत्याही सार्वजनिक कामात कधी भाग घेत नाहीत. तहानभूक हरपून एखाद्या छंदाच्या मागे लागावे तर तशीही शक्यता त्यांच्या आयुष्यात नसते. त्यांचे आयुष्य सुतासारखे सरळ असल्यामुळे आणि दिनचर्या ठरलेली असल्यामुळे वेळेत जेवण, वेळेत झोप आणि योग्य तेवढे काम असा त्यांचा दिनक्रम ठरलेलाच असतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्यात बिघाड होण्याचे काही कारणच नसते. मात्र ज्या लोकांना भरपूर काम असते, खूप व्याप मागे असतात आणि त्यामुळे ज्यांना वेळेवर जेवायला मिळत नाही, पुरेशी झोप मिळत नाही त्यांच्या आरोग्याला मात्र धोका असतो.

मग आरोग्य सांभाळावे की व्याप सांभाळावेत, असा प्रश्‍न त्यांना पडतो. पण त्यांचे व्याप त्यांना गप्प बसू देत नाहीत. म्हणून अशा लोकांना व्यापातूनही आरोग्य कसे सांभाळावे याच्या काही टिप्स् देण्याची गरज असते. अशा लोकांनी खाणे आणि व्यायाम यांच्याबाबतीतली शिस्त पाळण्याची फार गरज असते. मात्र त्यांना वेळेवर व्यायाम करायला सवड मिळत नाही आणि कधी खावे, काय खावे आणि किती खावे यावर त्यांचे नियंत्रण नसते.

असे असले तरी त्यांना काही गोष्टी आवर्जून करता येतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ब्रेकफास्ट न टाळणे, जेवणात आणि न्याहारीमध्ये द्विदल धान्यांचा वापर करणे. रोज सकाळी मॉर्निंग वॉक घेता आला नाही तरी शक्य तेवढे चालणे, मोठ्या इमारतीच्या पायर्‍या शक्यतोवर चढणे अशा गोष्टी त्यांच्या हातात असतात. आपल्याला वेळेवर व्यायाम आणि खाणे शक्य होत नाही म्हणून या दोन गोष्टी पूर्णपणे सोडून दिल्याच पाहिजेत असे नाही. त्यांच्या बाबतीत आपण जाता जाता काही पथ्ये तारतम्याने पाळू शकतो आणि आरोग्य राखू शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment