पाठदुखीवर सोपे व्यायाम

backache
एकाच अवस्थेत दीर्घकाळ बसल्यामुळे पाठदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. विशेषत: संगणकासमोर बसून काम करणार्‍या लोकांना हा त्रास अधिक संभवतो. त्यांना तर हात, खांदे, मान, पाठ यामध्ये काही ना काही तरी त्रास होण्याची शक्यता असते. विशेषत: पाठीच्या कण्याला आधार देणारे स्नायू दुखावले जाऊन किंवा आखडले जाऊन नव्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यासाठी मानेपासून माकड हाडापर्यंत सगळे स्नायू लवचिक असण्याची गरज आहे. त्यासाठी खालील व्यायाम करावेत.

१) पाठ वाकवणे – हात डोक्यापर्यंत वर करून पाठीला बाक देणे आणि हात मागे नेणे. हा व्यायाम दोन-तीन वेळा करावा. काम करताना सलगपणे एकाच अवस्थेत न बसता थोडेसे मधेच उठून शरीराला या दिशेने ताण द्यावा, त्यामुळे पाठ वाकली जाते आणि स्नायू लवचिक होतात. अशा प्रकारचा व्यायाम अधूनमधून करावा. त्याचा फायदा रक्ताच्या प्रवाहावर सुद्धा होत असतो.

२) केवळ तुमचे पाठीचेच स्नायू लवचिक असणे आवश्यक आहे असे नाही तर कमरेचे विशेषत: कटी म्हणजे पोटाच्या दोन बाजूंचे स्नायूही लवचिक असावे लागतात. त्यासाठी अर्धचक्रासन करावे. अर्धचक्रासन म्हणजे डाव्या कमरेवर डावा हात ठेवून उजवा हात कानाकडून डावीकडे वळवणे. असाच व्यायाम उजवा हात उजव्या कमरेवर ठेवून डावा हात कानाजवळून वर करून तो उजवीकडे वळवावा म्हणजे दोन्ही बाजूंनी कमरेला बाक मिळतो.

३) ताडासन – हात सरळ वर करावे आणि हातासहीत सगळ्या शरीराला वरच्या दिशेने ताण द्यावा. अशावेळी टाचावर उभे रहावे आणि जणू आपले शरीर कोणी तरी वर ओढत आहे इतका शरीराला मिळावा. त्यामुळे एका जागी बसून आखडलेले स्नायू मोकळे होतात. आपण झोपेतून उठल्याबरोबर आळस देतो. आळस देण्याच्या या क्रियेमध्ये सगळे शरीर आखडून पुन्हा सोडून देतो. आपण या आळस देण्याच्या क्रियेकडे व्यायाम म्हणून पहात नाही. परंतु त्यामुळे आपले आळसावलेले शरीर मोकळे होते याचा अनुभव मात्र आपल्याला येत असतो. तेव्हा केवळ झोपेतून उठल्यानंतरच नव्हे तर दिवसभरात कधीतरी चार-पाच वेळा आळस द्यावा. आळस देण्याच्या बाबतीत आळशीपणा करू नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment