डायलिसीस सोपे करणारी यंत्रणा

Dialysis
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईच्या शास्त्रज्ञांनी डायलिसीसची प्रक्रिया सोपी, जलद आणि स्वस्त करणारे मेंब्रेन तयार करण्यात यश मिळवले आहे. या नव्या शोधामुळे डायलिसीसचीच प्रक्रिया ५० टक्याने स्वस्त तर होईलच, परंतु ही प्रक्रिया निम्म्या वेळेत होईल. त्याशिवाय डायलिसीस केल्या जाणार्‍या रुग्णासाठी ती अधिक सुरक्षित असेल, असा विश्‍वास ते शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी डायलिसीस कराव्या लागणार्‍या रुग्णांना रुग्णालयात जावे लागत होते, परंतु आता विकसित करण्यात आलेल्या नव्या तंत्रामुळे डायलिसीसचे यंत्र हे पोर्टेबल होणार आहे. म्हणजे तेच रुग्णापर्यंत नेता येईल.

किडनीचा विकार झालेल्या रुग्णाला डायलिसीस हे वरदान असते. या प्रक्रियेमध्ये त्याच्या रक्तातील दूषित घटक, जादा पाणी काढले जाते आणि रक्त शुद्ध केले जाते. कारण त्याची नैसर्गिक रक्त शुद्धीकरण यंत्रणा ही निकामी झालेली असते. किडनीचा विकार झाला म्हणजे लोक पूर्वी मृत्यूचे निमंत्रण समजत असत. कारण रक्ताचे शुद्धीकरणच बंद होत असे, लघवीला त्रास होत असे, शरीरावर सूज येत असे आणि लवकरच रुग्ण मृत्यूमुखी पडत असे. अशा रुग्णांची संख्या वाढत आहे आणि डायलिसीसचा खर्चही प्रचंड आहे. यातले ९० टक्के रुग्ण डायलिसीसचा खर्च करू शकत नाहीत.

भारतात २०३० सालपर्यंत अशा रुग्णांची संख्या १० कोटी पर्यंत पोचेल असा इशारा देण्यात आलेला आहे. त्यांना डायलिसीसचा खर्च परवडावा यासाठी काही तरी करण्याची गरज होती. आजच देशातले आठ लाख रुग्ण दररोज डायलिसीसचा लाभ घेत असतात. त्यांना हा खर्च परवडावा म्हणून काही तरी करण्याची गरज होती. ते काम आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी केले आहे. कृत्रिमरित्या रक्ताचे शुद्धीकरण करणार्‍या यंत्रणेतील मेंब्रेन म्हणजे चाळणी त्यांनी नव्याने विकसित केली आहे. प्रचलित पद्धतीत ही चाळणी महागही असते आणि ती पुरेशी कार्यक्षमही नसते. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतील काही अशुद्ध घटक या चाळणीत शिल्लकच राहतात. म्हणून ती आता बदलण्यात आली आहे. आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या प्रयत्नांचे नेतृत्व जयंत बेल्लारे यांनी केले आहे. त्यांच्या या संशोधनाचा लाभ भारतातल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर होईल अशी आशा आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment