जुनाट आरसा? छे ! हा तर ऐतिहासिक वारसा

फोटो साभार ब्रिस्टल ऑक्शन

घरात पडून असलेल्या जुन्यापुराण्या वस्तू म्हणजे कचरा अशी आपली समजूत असते. पण अशाच एखाद्या वस्तूची किंमत आजच्या बाजारात कोट्यवधी रुपये आहे असे समजले तर एखाद्याची मनस्थिती कशी असेल? असाच अनुभव एका कुटुंबाला नुकताच आला असून त्याच्या घरात ४० वर्षे बाथरूम मध्ये टांगलेला जुनाट आरसा हा ऐतिहासिक वारसा असल्याचे नुकतेच उघडकीस आले.

हा आरसा या कुटुंबाला त्यांच्या आजीकडून मिळालेला होता. गेली ४० वर्षे तो बाथरूम मध्ये टांगला गेला होता. पण जेव्हा तो काढून टाकण्याची वेळ आली तेव्हा त्यांचे मूल्य ऐकून या कुटुंबाचा होश उडाला. हा आरसा फ्रांसची शेवटची महाराणी मेरी अँटोनेट हिच्या वापरातील असल्याचे दिसून आले. या आराश्यावर एक चांदीची पट्टी असून त्यावर काहीतरी मजकूर होता. जेव्हा या मजकुराचे डीकोडिंग केले गेले तेव्हा त्यावर महाराणीचे नाव दिसून आले.

आता हा आरसा ब्रिस्टल ब्रिटन येथे लिलावात ठेवला गेला आहे. १९ बाय १५ इंचाच्या या आरशाला किमान १३ हजार डॉलर्स म्हणजे ९.६९ लाख रुपये किमत मिळेल अशी अपेक्षा आहे. हा आरसा नेपोलीयनची तिसरी पत्नी युजीनी हिने जेव्हा महाराणी मेरीचे काही सामान विकले गेले होते तेव्हा खरेदी केल्याची नोंद आहे. १८ व्या शतकातील या आरशाला अक्रोड लाकडाची कलाकुसर केलेली फ्रेम आहे. त्यावर चांदीची पट्टी आहे. त्यामुळे हा आरसा ऐतिहासिक वारसा ठरला आहे.

मेरीने फ्रांसचा राजा सोळावा लुई यांच्याबरोबर विवाह केला होता. राजा लुई १७७४ ते १७९२ या काळात गादीवर होता. नंतर फ्रेंच क्रांती मध्ये त्याला ठार केले गेले होते.