अँट ग्रुप आयपीओ स्थगितीने जॅक मा याना झटका

फोटो साभार कनेक्शन ब्लॉग

चीनी कंपनी अँट ग्रुप जगातील सर्वात मोठा आयपीओ आणत असल्याच्या बातम्या झळकल्या असतानाच शांघाई स्टॉक एक्स्चेंजने या आयपीओला स्थगिती दिली आहे. ई कॉमर्स क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी अलीबाबाचे संस्थापक जॅक मा याना हा मोठा झटका असल्याचा मानले जात आहे. अलीबाबाची या ग्रुप मध्ये ३३ टक्के हिस्सेदारी आहे. यामुळे अलीबाबाच्या शेअर मध्ये ७ टक्के घसरण झाल्याचे समजते.

अँट ग्रुपच्या या आयपीओ बद्दल गुंतवणूकदारांमध्ये खूप उत्साह होता. हॉंगकॉंग आणि शांघाई एक्स्चेंज मध्ये सूचीबद्दतेसाठी वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून ३ लाख कोटींची बोली लागली होती. या आयपीओ मधून अँट ग्रुप ३६ अब्ज डॉलर्स गोळा करण्याच्या प्रयत्नांत होता. मात्र शांघाई स्टॉक एक्स्चेंजने या आयपीओला स्थगिती दिल्याने जगातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याचा विक्रम होऊ शकला नाही.यामागे चीन सरकारवर केली गेलेली टीका हे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

अँट ग्रुप अनेक प्रकारच्या वित्त सेवा उत्पादनाचे परिचालन करतो. त्यात चीनच्या अलिपे डिजिटल वॉलेटचा समावेश असून जगातील सर्वात मोठ्या मनी मार्केट फंड मध्ये त्याचा समावेश होतो. त्याचे एकूण मूल्य १५० अब्ज डॉलर्स आहे. हा आयपीओ यशस्वी झाला असता तर जगाच्या इतिहासातील तो सर्वात मोठा आयपीओ ठरला असता. सौदीच्या अराम्को ने गेल्या वर्षी २९ अब्ज डॉलर्सचा आयपीओ आणला होता आणि तो सर्वात मोठा आयपीओ ठरला होता.