ऑस्ट्रियाच्या राजधानीत 26/11 सारखा दहशतवादी हल्ला


व्हिएन्ना : ऑस्ट्रियाची राजधानी असलेल्या व्हिएन्नात दहशतवादी हल्ला झाला असून एकाच वेळी अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. आतापर्यंत 2 जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहेत, तर 15 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच या हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे. परंतु, त्या दहशतवाद्याच्या शरीराला बॉम्ब लावण्यात आला होता.

मुंबईत 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे व्हिएन्नामध्ये हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार एका दहशतवाद्याला पोलिसांनी ठार केले असून त्याच्या शरीरावर बॉम्ब बांधण्यात आला होता. दहशतवाद्याच्या शरीरावर बांधण्यात आलेला बॉम्ब निकामी करण्यासाठी पोलिसांच्या एक पथकाला पाचारण करण्यात आले होते. दहशतवाद्याच्या शरीरावर बांधण्यात आलेला बॉम्ब निकामी करण्यात या पथकाला यश आलं आहे. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या लोकांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोकांना दहशतवाद्यांनी वेठीसही धरले होते.

एव्हाना शांत असणाऱ्या ऑस्ट्रियातील व्हिएन्ना शहरात सोमवारी मात्र भीतीचे वातावरण होते. अंदाधुंद गोळीबार करत काही दहशतवाद्यांनी संपूर्ण शहर वेठीस धरले होते. शहरातील सहा वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. सेंट्रल स्वीडन प्लाट्ज स्क्वॉयरवर दहशतवादी हल्ल्याची घटना घडली. त्या ठिकाणी एक धार्मिक स्थळही आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे ऑस्ट्रियातील गृहमंत्रालयाच्या टीमने सांगितले आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.