टाटा स्टीलच्या कर्मचाऱ्यांना अजून वर्षभर वर्क फ्रॉम होमची मुभा


नवी दिल्ली – एम्ससह नीती आयोगाने देशात पुन्हा कोरोनाची लाट य़ेण्याची शक्यता वर्तविल्यामुळे दीर्घकाळ कोरोनाचे संकट राहणार असल्याने आणखी 365 दिवस टाटा ग्रुपची मोठी कंपनी टाटा स्टीलने कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची मुभा दिली आहे. रविवारपासून यासाठीचे एक नवीन मॉडेल लागू करण्यात आले आहे.

याबाबत टाटा स्टीलने दिलेल्या एका निवेदनात याची माहिती देण्यात आली आहे. विश्वास आणि परिणाम देणाऱ्या कामाच्या संस्कृतीकडे कंपनी पाऊल टाकत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगले वातावरण व लवचिकता मिळेल. टाटा स्टीलच्या कर्मचाऱ्यांना आता एक नोव्हेंबरपासून एक वर्षात कितीही दिवस घरातून काम करण्याची सुविधा मिळणार आहे. एखाद्या विशेष स्थानावर या कर्मचाऱ्यांना काम करावे लागते.

त्याचबरोबर कंपनीने असे देखील स्पष्ट केले आहे की, महामारीचे संकट जेव्हा कधी संपेल व परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर कंपनीचे हे कर्मचारी आपल्या इच्छित स्थळी स्थलांतरित होण्यासाठी तयार असतील. यामुळे या कर्मचाऱ्यांना देशातील कुठूनही काम करण्याची सुविधा दिली जाईल. तसेच या नवीन योजनेचे एक वर्षात परिक्षण केले जाईल. यानुसार उत्पादकता आणि प्रतिक्रिया पाहून एक वर्षानंतर पुन्हा याचा अभ्यास केला जाईल.

याबाबत माहिती देताना टाटा स्टीलचे उपाध्यक्ष सुरेश दत्त त्रिपाठी यांनी सांगितले की, उत्पादकतेच्या पारंपरिक विचाराला दूर करण्यास या महामारीने मदत केली आहे. अनेक मिथके या काळात तुटल्यामुळे नीती आणखी चांगले काम आणि जीवनाचे संतुलन राखण्यास मदत करणार आहे.