मुंबई पोलिसांनी बजावले कंगना आणि तिच्या बहिणीला समन्स


मुंबई – कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंदेलला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे. 10 नोव्हेंबरला या दोघी बहिणींना चौकशीसाठी हजर राहण्यास आदेश देण्यात आले आहेत. सोशल मीडिया पोस्टद्वारे समुदायांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनंतर न्यायालयाने कंगना आणि रंगोलीला समन्स बजावले आहे.

मुंबईची तुलना कंगना राणावतने पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. संपूर्ण देशातील वातावरण तिच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन ढवळून निघाले होते. कंगनाने त्यानंतरही वादग्रस्त वक्तव्ये करणे सुरूच ठेवले होते. त्याचबरोबर कर्नाटक पोलिसांनी वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी कंगना विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांना या प्रकरणी 10 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

दरम्यान, समाजात तेढ पसरवणारे वक्तव्य कंगनाने केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध वांद्य्रातील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने त्यानंतर कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांना यासंदर्भात तपास करण्याचे आदेश दिले होते.