52 हजार कोटी रुपयांनी घटली मुकेश अंबानींची संपत्ती


मुंबई – आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींच्या एकूण संपत्तीत एका झटक्यात ५२,००० कोटींची घट झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये तिमाही नफ्यातील घसरणीनंतर गेल्या तीन महिन्यांत सर्वात मोठी घसरण आल्याने ही स्थिती ओढवली.

कंपनीचे शेअर्स सोमवारी ८.६२% ने गडगडले. १७७ रुपयांनी ते घसरून १८७७ रुपयांवर बंद झाल्यामुळे सुमारे ५.२५ लाख कोटी रुपये (७१०० कोटी डॉलर) अंबानींची एकूण संपत्ती राहिली आहे. ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार, त्यांचा हा मार्चनंतर सर्वात वाईट दिवस राहिला. रिलायन्सने शुक्रवारी तिमाही निकाल जाहीर केले. यात १५% घटीसह ९,५७० कोटींचा नफा दाखवला.

कोरोनामुळे इंधनाची मागणी घटल्याने महसूल २४% घटून १.१६ लाख कोटी रु. राहिला. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स समूह ऑइल व पेट्रोकेमिकल क्षेत्रातील दिग्गज कंपनी झाल्यानंतर स्वत:ला तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवांकडे वळवत आहे. ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार, रिलायन्सच्या शेअर्समध्ये या वर्षी जवळपास २९% ची तेजी दिसली.