धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी अमिताभ बच्चन, सोनी टिव्ही विरोधात भाजप आमदाराची तक्रार


मुंबई – कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्ही यांच्या विरोधात या कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरुन तक्रार दाखल करण्यात आली आहे. लातूर पोलिसांमध्ये ही तक्रार भाजप आमदार अभिमन्यु पवार यांनी दाखल केली आहे. आमदार पवार यांनी आपल्या तक्रारीत केबीसी या कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, केबीसी कार्यक्रमातील हिंदू या प्रश्नावरुन जनजागरण समितीनेही आक्षेप व्यक्त केला आहे.

30 ऑक्टोबर रोजी कोन बनेगा करोडपती या कार्यक्रमात एक प्रश्न विचारण्यात आला होता. कोणत्या धर्मग्रंथाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले? असा हा प्रश्न होता. या प्रश्नाच्या उत्तरादाखल ‘मनूस्मृती’, ‘श्रीमद् भगवतगीता’ आणि आणखी इतर दोन धर्मग्रंथांची नावे पर्याय म्हणून देण्यात आली होती. आमदार अभिमन्यू पवार यांनी यावरच आक्षेप घेतला आहे.

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार अभिमन्यू पवार यांनी म्हटले आहे की, असा प्रश्न विचारुन केवळ हिंदू धर्मियांचा अपमान करण्याचा उद्देश आहे. प्रश्न विचारुन उत्तरादाखल दिलेल्या पर्यायातही सर्व हिंदू धर्मग्रंथांचाच उल्लेख होता. एकाही इतर धर्मग्रंथाचा त्यात उल्लेख करण्यात आला नाही. यामागे मोठी कॉन्फीरसी थेअरी (रणनिती) असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्ही यांनी तात्काळ माफी मागवी, अशी मागणीही आमदार अभिमन्यू पवार यानी केली आहे. पण अद्याप अमिताभ बच्चन किंवा सोनी टीव्हीकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया पुढे आली नाही.