दाऊदच्या गावाकडील मालमत्तांचा १० तारखेला लिलाव


मुंबई – कुख्यात माफीया डॉन दाऊद इब्राहीम याच्या मूळ गावातील ७ मालमत्तांचा लिलाव दि. १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. स्मगलर फॉरेन करन्सी मॅन्युपिलेटर कायदा (साफेमा) अंतर्गत एकूण १७ मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. दाऊदच्या मुंबईतील मालमत्तांचा यापूर्वीच लिलाव करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दाऊदच्या १३ मालमत्ता आहेत. त्यापैकी ७ जमिनींचा लिलाव करण्यात येणार असून त्याची अपेक्षित किंमत ८० लाख रुपये आहे, अशी माहिती ‘साफेमा’चे अधिकारी सैय्यद मुनाफ यांनी दिली. सन १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर दाऊदच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या. मात्र, त्याचा लिलाव करण्यास २५ वर्ष वाट पाहावी लागली.

त्यानंतर सन २०१८ मध्ये नागपाड़ा येथील रौनक अफ़रोज़ हॉटेल, डांबरवाला इमारत, शबनम गेस्ट हाऊस आणि दाऊदची बहीण हसीना पारकरची सदनिका यांची विक्री करण्यात ‘साफेमा’ विभागाला यश आले. आता विभागाचा मोर्चा दाऊदच्या गावाकडील मालमत्तांकडे वळला आहे.