हाडे फोडणाऱ्या थंडीत ठाम राहण्यासाठी आयटीबीपीची फिट इंडिया वॉकेथॉन

फोटो साभार अमर उजाला

सध्या लडाखला लागून असलेल्या भारत चीन सीमेवर सतत कुरबुरी सुरु आहेत आणि आता गोठविणाऱ्या थंडीमध्ये तेथील परिस्थिती आणखी बिकट बनणार हे लक्षात घेऊन तश्या बिकट परिस्थितीत पाय डगमगू नयेत म्हणून इंडोतिबेट बॉर्डर फोर्सने थरच्या वाळवंटात २०० किमीची वॉकेथॉन पूर्ण केली आहे. फिट इंडिया या उपक्रमाअंतर्गत ३१ ऑक्टोबरपासून तीन दिवस हे जवान वॉकेथॉनमध्ये सामील झाले होते. त्यात आयटीबीपीचे डिजी एस एस देसवाल हेही जवानांसोबत होते.

देसवाल या संदर्भात म्हणाले, आमचे जवान पूर्ण जोशात आहेत. भारत चीन सीमेवर कहीही घडले तरी लडाख सुरक्षित राहील. आमच्या जवानांच्या पराक्रमात कोणतीही कमतरता नाही. ३४८८ किमी लांबीच्या भारत चीन सीमेची निगराणी आमच्याकडे आहे आणि त्यामुळे आमच्या जवानांना या कामगिरीसाठी फिट ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे वेळोवेळी असे कार्यक्रम घेतले जातात.

भारत चीन सीमा ही जगातील सर्वात दुर्गम सीमा आहे. १० हजार फुट उंचीवर असलेल्या या प्रदेशात ऑक्सिजनचे प्रमाण अतिशय कमी आहे आणि येथे गवताचे पाते सुद्धा उगवत नाही. थंडीच्या दिवसात येथील तापमान उणे ४५ डिग्री पर्यंत जाते. या तापमानात डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करणे हे सोपे काम नाही. आयटीबीपीचे ९० हजार जवान ही जबाबदारी सांभाळत आहेत.

या वॉकेथॉनला केंद्रीय मंत्री किरेन रीजीजू यांनी नाथूवला गावातून हिरवा झेंडा दाखविला होता. भारत पाकिस्तान सीमेवर असलेल्या थर वाळवंटात ही वॉकेथॉन झाली.