मुंबईत मोफत करोना चाचणी करणारी २४४ केंद्रे सुरु

बृहनमुंबई महापालिकेने सोमवारी २४४ केंद्रांवर कोविड १९ ची मोफत चाचणी सुविधा सुरु केली आहे. करोना संदर्भातली कोणतीही लक्षणे दिसत असलेले नागरिक १९१६ या नंबरवर फोन करून मोफत चाचणी संदर्भातली माहिती मिळवू शकणार आहेत. त्यासाठी बीएमसीने एक वेबसाईट तयार केली असून त्यावर संबंधित संशयिताच्या घराजवळ कुठे हे केंद्र आहे याची माहिती घेता येणार आहे.

हॉस्पिटल, दवाखाने याच्या मदतीने ही केंद्रे सुरु केली गेली आहेत. त्यात काही केंद्रांवर आरटी- पीसीआर ची चाचणी होऊ शकेल तर बाकी केंद्रांवर अँटीजेन चाचणी होऊ शकेल. मुंबईत आत्तापर्यंत ५११५७ इमारती सील केल्या गेल्या होत्या त्यापैकी ४३६३८ इमारती पुन्हा सुरु झाल्या आहेत. या इमारतीत राहणारे करोना रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. तरीही अजून ७४७९ इमारती सील आहेत.

विशेष म्हणजे सुरवातीला इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये करोना संक्रमण कमी होते पण आता झोपडपट्टी आणि चाळीत राहणाऱ्या नागरिकांपेक्षा इमारतीत राहणाऱ्यांत करोना संक्रमण अधिक दिसते आहे. त्यामुळे इमारती सील केल्या गेल्या आहेत. झोपडपट्टी आणि चाळीत करोना संक्रमण खूप कमी झाले आहे पण तरीही ६०९ अॅक्टीव्ह कन्टोन्मेंट झोन असून या भागात २९.३ लाख वस्ती आहे. आजपर्यंत मुंबईत २,५८,४०५ केसेस झाल्या असून त्यात मृतांचे प्रमाण १०३१८ इतके आहे.