प्लेसमेंट सर्व्हिस

placement
सध्या आपल्या देशामध्ये नोकरी आणि शिक्षण यांच्या संबंधात जो अमसतोल निर्माण झाला आहे त्यातून प्लेसमेंट सर्व्हिस ही एक सेवा विकसित झाली आहे. या सेवेमध्ये नोकरी मिळवणारा आणि नोकरी देणारा या दोन्हींच्या मध्ये चांगलाच समन्वय साधला जातो. आपल्या देशात बेकारी आहे असे बर्‍याचदा म्हटले जाते. परंतु काही क्षेत्रात अशी परिस्थिती आहे की बेकारी नावाचा प्रकार या देशात असेल असे वाटतसुध्दा नाही. मग हा असमतोल काय आहे? देशात बेकारी नाही का? या प्रश्‍नाचे उत्तर देशात बेकारी आहे असे होऊ शकते. पण ती कोठे आहे? जिथे कसलेही कौशल्य हाती नसणारे लोक आहेत तिथे बेकारी आहे. आपल्या देशात शिक्षण व्यवस्थेला काही शिस्त नाही. शिक्षण घेऊ इच्छिणारे लोक नोकरी मिळते म्हणून शिकत राहतात आणि आपण एक विशिष्ट शिक्षण घेतले की आपल्याला त्या शिक्षणाशी संबंध असलेली किंवा नसलेली नोकरी मिळालीच पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. डी.एड. किंवा बी.एड. अशा व्यावसायिक शिक्षणाच्या बाबतीत तर असे नेहमीच घडते. या दोन पदव्या मिळवणारा विद्यार्थी आपल्याला शिक्षक म्हणून नोकरी मिळणारच अशी अपेक्षा बाळगून बसतो आणि ती मिळाली नाही की निराश होतो आणि बहुतेक त्याला ती मिळत नाही. कारण त्याच्यासारखीच अपेक्षा धरून लाखो मुलांनी डी.एड., बी.एड. या पदव्या मिळवलेल्या असतात.

शिकणारी मुले लाखो असली तरी नोकर्‍या काही त्या संख्येत निर्माण होत नाहीत. काही मुले केवळ बीए. बी.कॉम, बी.एस्सी अशा औपचारीक पदव्या मिळवत राहतात. त्याही शिक्षणातून कोणत्याही नोकरी विषयक कौशल्याचे शिक्षण किंवा प्रशिक्षण मिळालेले नसते. असे लाखो बेकार पडून आहेत. मात्र दुसर्‍या बाजूला अशी परिस्थिती आहे की विशिष्ट कौशल्य असणारे लोक संख्येने फार कमी आहेत आणि त्यांना मागणी प्रचंड असल्यामुळे त्यांची किंमत वाढलेली आहे. विशेषतः संगणक शास्त्राचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी किंवा प्रशासनाचा उत्तम अनुभव असलेले प्रशिक्षित प्रशासक, वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करू शकणारे पदवीधर हे मिळत नाहीत. चांगले डीटीपी ऑपरेटर मिळत नाहीत. अनेक दैनिकांना संपादकीय कौशल्य जाणणारे पदवीधर प्रशिक्षित तरुण मिळत नाहीत. अशी न मिळणार्‍या प्रशिक्षित कुशल तंत्रज्ञांची मोठी गरज असते. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर काही क्षेत्रात नोकर्‍या कमी आणि त्या मागणार्‍यांची संख्या मोठी आहे. उलट काही क्षेत्रात नोकर्‍या खूप आहेत पण त्या मागणार्‍यांची संख्या कमी आहे.

ही विसंगती कमी करून योग्य त्या संस्थांना योग्य ते कर्मचारी, तंत्रज्ञ मिळवून देणे असा एक व्यवसाय विकसित झाला आहे. तो म्हणजे प्लेसमेंट सर्व्हिस. या व्यवसायाचे स्वरूप थोड्याबहुत फरकाने शासनाच्या रोजगार विनिमय केंद्रासारखेच आहे. परंतु शासनाचे हे केंद्र केवळ सरकारी आणि निमसरकारी नोकर्‍या मिळवून देते. त्यातसुध्दा नाव नोंदणार्‍या व्यक्तीला नोकरी मिळवून देण्याची हमी हे केंद्र घेत नाही. एका बाजूला इच्छुकांनी आपली नावे नोंदलेली असतात आणि दुसर्‍या बाजूला काहीच नसते. जेव्हा त्या त्या खात्यातून माणसांची गरज कळवली जाते तेव्हा या केंद्रातील उमेदवारांची नावे नोंदलेल्या क्रमानुसार त्या संस्थांना कळवली जातात. केंद्राने नावे सुचवले म्हणजे नोकरी दिलीच पाहिजे असे बंधन या केंद्रावर नाही आणि योग्य त्या उमेदवाराला त्याच्या लायकीची नोकरी कोठे आहे हे दाखवण्याची जबाबदारीसुध्दा केंद्रावर नाही. या केंद्राचा खाक्या निव्वळ सरकारी स्वरूपाचा आहे. त्यामुळे नोकर्‍या मागणारे आणि नोकर्‍या देणारे यांचा योग्य मेळ या सरकारी रोजगार विनिमय केंद्रातून घातला जातोच असे नाही.

त्याची ही उणीव भरून काढण्याचे काम प्लेसमेंट सर्व्हिस करते. प्लेसमेंट सर्व्हिसकडे संस्था आणि कंपन्यांची रिक्वायरमेंट म्हणजे गरज नोंदली जाते आणि नोकरी मिळवण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी या सर्व्हिसकडे नावे नोंदवतात. नावे नोंदवण्यास पैसे घ्यावेत की नाही हा ज्या त्या संस्थेचा कार्यपध्दतीचा भाग आहे. परंतु साधारणपणे नाव नोंदणीला पैसे घेतले जात नाहीत. आपल्याकडे नाव नोंदलेला विद्यार्थी कोणत्या कंपनीची गरज पुरी करू शकतो याचा प्लेसमेंट सर्व्हिसकडून तळमळीने आढावा घेतला जातो आणि त्याला ती नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्या विद्यार्थ्याकडे ते कौशल्य असते आणि कंपनीला त्या व्यक्तीची गरज असते. अशा परिस्थितीत नोकरी मिळवून दिल्याबद्दल त्या उमेदवाराच्या पहिल्या वेतनाचा काही भाग प्लेसमेंट सर्व्हिसला मोबदला म्हणून मिळतो. तर कंपनीची गरज भागल्यामुळे कंपनीसुध्दा त्या व्यक्तीच्या एक महिन्याच्या पगाराची रक्कम प्लेसमेंट सर्व्हिसला बक्षीस म्हणून देते. हा व्यवसाय कसलीही गुंतवणूक न करता येतो. कंपन्यांची गरज नोंदवून घेणे यासाठीच्या आणि विद्यार्थ्यांच्या नावे नोंदणीसाठीच्या सोयी निर्माण करण्यासाठी लागेल तेवढेच म्हणजे अगदी नाममात्र भांडवल लागते. पण उत्पन्न मात्र चांगले मिळते.

Leave a Comment