नियमित झोप मेंदूच्या विकासासाठी आवश्यक

लवकर निजे, लवकर उठे त्यास ज्ञानसंपत्ती लवकर भेटे अशी एक म्हण मराठीमध्ये आहे. जो मुलगा रात्री लवकर झोपतो आणि सकाळी लवकर उठतो त्याची बुध्दीमत्ता चांगली होते. असे या म्हणीतून सूचित केले आहे. या म्हणीत लवकर झोपण्याला तर महत्त्व दिले आहेच पण लवकर उठण्यालाही तेवढेच महत्त्व दिले आहे. मात्र झोपण्याची आणि उठण्याची वेळ ही बुध्दीच्या विकासाशी संबंधित आहे हे या म्हणीतून अधोरेखित केले आहे. ब्रिटनमधल्या काही संशोधकांनी झोपेच्या वेळा आणि बुध्दीची वाढ यांचा संबंध शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही या दोन गोष्टींचा निकटचा संबंध असतो असेच आढळले.

ब्रिटनमधल्या काही संशोधकांनी घराघरांना भेटी देऊन मुलांच्या झोपण्याच्या वेळा आणि त्यांच्या बुध्दीमत्तेची चमक यावर संशोधन केले तेव्हा त्यांना असे आढळून आले की ज्या मुलांच्या झोपेच्या वेळा नियमित नसतात त्यांची आकलनशक्ती कमी असते. या संबंधात मिलेनियम कोहर्ट स्टडी या शीर्षकाखाली ११ हजार विद्यार्थ्यांची निरीक्षणे करण्यात आली. त्यातली सर्व मुले ७ वर्षाच्या आतील होती. यातील बहुतेक मुलांच्या झोपण्याच्या वेळा ठरलेल्या नव्हत्या. ती मुले कधी साडे सात वाजता झोपत तर कधी साडे आठ वाजता झोपत. त्यांच्या झोपेच्या वेळेतला एवढा एक फरक सुध्दा पुढे त्यांच्या अभ्यासावर परिणाम करू शकतो असे दिसून आले.

या मुलांच्या झोपेच्या वेळा वयाच्या तिसर्‍या वर्षापर्यत ठीक असतात. मात्र तिसर्‍या वर्षानंतर मुलांच्या झोपेच्या वेळात फरक पडायला सुरूवात होते असे दिसून आले. मुलींच्या संदर्भात असे दिसले की त्यांच्या झोपेच्या वेळा सातव्या वर्षापर्यंत ठराविक असतात. पण सात वर्षे पूर्ण झाली की त्यांच्या वेळात फरक पडायला लागतो. मात्र बुध्दीमत्तेवर परिणाम होतो तो सातव्या वर्षाच्या आतील सवयींचा होतो. मुली सातव्या वर्षापर्यंत ठराविक वेळी झोपतात. म्हणून त्यांची बुध्दीमत्ता मुलांपेक्षा तीव्र असते. दहावी बारावीचे निकाल लागले की मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारल्याच्या बातम्या येतात. या मागे झोपेच्या वेळातील बदलाची पार्श्‍वभूमी असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment