स्वतःच्या निधन अफवेला कपिल देव यांनी असे दिले उत्तर

टीम इंडियाचे माजी कप्तान आणि भारताला पहिला वर्ल्ड कप मिळवून देणारे कप्तान कपिल देव यांचे निधन झाल्याची अफवा सोमवारी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आणि अनेक युजर्स कडून कपिल देव यांना श्रद्धांजली वाहिली गेली. मात्र कपिल देव यांनी या अफवेला खास उत्तर दिले.

निधनाची बातमी सोमवारी व्हायरल झाली त्याचा दिवशी कपिल यांनी २१ सेकंदाचा त्यांचा एक व्हिडीओ सादर केला. यात कपिल देव यांची प्रकृती चांगली दिसते आहे. हा व्हिडीओ एका खासगी बँकेसाठी असून यात कपिल देव जांभळा टी शर्ट मध्ये दिसत आहेत. ते म्हणतात, ‘हाय, मी कपिल. बर्कले फॅमिली सोबत मी माझी गोष्ट शेअर करणार आहे. त्यात क्रिकेट संबंधी काही किस्से आणि काही आठवणी आहेत. सणाचे दिवस आहेत, ११ नोव्हेंबरला तयार रहा प्रश्न उत्तराच्या कार्यक्रमासाठी.’

ऑक्टोबर २३ रोजी कपिल देव याना अचानक हृदयाचा त्रास होऊ लागल्याने दिल्लीच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल केले गेले होते आणि तेथे त्यांच्यावर अँजीओप्लास्टी केली गेली होती. त्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी त्यांना घरी सोडले गेले होते. सोमवारी सकाळी कपिल याना पुन्हा रूग्णांलयात दाखल केले गेल्याचे आणि तेथे त्यांचे निधन झाले असल्याची अफवा सोशल मीडियावर त्यानंतर पसरली होती.