लेबर कॉन्ट्रॅक्टर

labour-contractor
सध्याच्या काळामध्ये शारीरिक श्रम करणारे मजूर मिळणे फार मुश्कील झाले आहे. त्यामुळे एखादे मोठे काम तडीस नेण्यासाठी ते विशिष्ट काम करण्याचे कौशल्य ज्ञात असणार्‍या विशिष्ट मजूरच कामावर ठेवावे लागतात. काही मजुरांमध्ये उत्तम स्लॅब टाकण्याचे कसब असते, तर काही मजूर खोदकाम करण्यात वाकबगार असतात. काहींना भूमिगत केबल टाकण्याची कला ज्ञात असते तर काही मजूर घरे बदलणार्‍या लोकांचे सामान वाहून नेण्यात तज्ज्ञ असतात. परंतु अशा प्रकारचे स्पेशल काम करणारेच काय पण ओबडधोबड काम करणारे अकुशल मजूर सुद्धा मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे. मग काही वेळा रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी आंध्रातले मजूर आणावे लागतात, तर केबल टाकण्यासाठी ओरिसातल्या मजुरांची गरज भासते. सेंट्रिंगची उत्तम कामे करणारे मजूर बंगालमधून आणावे लागतात, तर बांधकामावर बिहारमधले मजूर उत्तम काम करतात. सध्या सार्‍या देशातच बिहार, बंगाल, ओरिसा, आंध्र या चार राज्यातले अंगमेहनत करणारे मजूर सगळीकडे कामे करताना दिसत आहेत. मात्र कामाची गरज ओळखून त्यांच्याशी संपर्क साधणे, त्यांना घेऊन येणे, नेऊन सोडणे, कामाच्या काळात त्यांची व्यवस्था करणे अशी अनेक कामे करणार्‍या दलालांची किंवा एजंटांची गरज असते.

वरील प्रकारची कामे ज्या कंपन्यांना करावी लागतात त्यांचा विशिष्ट प्रकारच्या मजुरांशी थेट संपर्क नसतो. त्यामुळे अशा मजुरांची सविस्तर माहिती असणार्‍या आणि त्यांच्याशी संपर्क असणार्‍या लेबर कॉन्ट्रॅक्टरकडून त्या मजुरांशी संपर्क साधावा लागतो. या गरजेतून आणि परिस्थितीतून लेबर कॉन्ट्रॅक्टर हा एक नवा व्यवसाय उदयास आला आहे. हा व्यवसाय करण्यास भांडवल लागत नाही. मात्र ठिकठिकाणचे मजूर, त्यांचे जत्थे आणि त्यांच्या कामाची स्पेशालिटी यांची भरपूर माहिती अशा कॉन्ट्रॅक्टरकडे असावी लागते. त्याचे हे संपर्क हेच त्याचे भांडवल असते. अशा प्रकारचा हा व्यवसाय फक्त परराज्यातल्या मजुरांच्या बाबतीतच करता येतो असेही काही नाही, तर स्थानिक पातळीवर सुद्धा अशा मजुरांना संघटित करणार्‍यांना मोठी मागणी असते. तेव्हा मोठी कामे सुरू असतील त्या ठिकाणी संपर्क साधून त्यांची गरज जाणून घेणे आणि संपर्कातून मजुरांची माहिती करून घेऊन त्याला काम मिळवून देण्याची हमी देणे अशा स्वरूपाचे हे काम आहे. म्हणजे हा सगळा संपर्काचा धंदा आहे. यातून अशा लेबर कॉन्ट्रॅक्टरला दोन प्रकारे उत्पन्न मिळू शकते. एक म्हणजे एखाद्या कामाच्या ठेकेदाराला पाहिजे तेवढे मजूर मिळवून देणे आणि ते मिळवून दिल्याबद्दल काही विशिष्ट रक्कम घेऊन मोकळे होणे.

दुसरी पद्धत असते ती अशा एजंटाला त्या कामात गुंतवून टाकणारी असते. म्हणजे तो केवळ मजूरच मिळवतो असे नाही, तर त्या मजुरांकडून कामे करून घेण्याची जबाबदारीही स्वीकारतो आणि त्यांच्याकडून कामे करवून घेतो. पहिल्या पद्धतीत एकदा एखाद्या कंत्राटदाराला मजूर मिळवून दिल्यानंतरची जबाबदारी एजंटावर नसते आणि नंतर ते मजूर काय काम करतात याच्याशी त्याचा काही संबंध नसतो. त्यामुळे त्या पहिल्या पद्धतीत एजंटाला कमाई कमी होते. दुसर्‍या पद्धतीत मात्र त्याची जबाबदारी वाढलेली असते आणि मुख्य कंत्राटदाराकडून त्याला काही विशिष्ट रक्कम दिली जाते. त्यातून तो मजुरांना पगार देतो. त्या विशिष्ट रकमेतून पगार वजा जाता उरलेली सारी रक्कम त्याला मिळते. म्हणजे या प्रकारात जबाबदारीही जास्त असते आणि उत्पन्नही जास्त असते. परंतु बहुतेक एजंट या दुसर्‍या प्रकाराच्या भानगडीत पडत नाहीत. कारण त्या पद्धतीत काम करवून घ्यायचे झाल्यास त्याला प्रत्येक क्षेत्राची तांत्रिक माहिती असणे जरुरीचे होईल आणि ते नसताना त्याने मजूरही स्वत:च आणले आणि कामही स्वत:च करवून घेतले तर त्याचा तोटा होण्याची शक्यता असते. तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे असे होऊ शकते.

लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करणार्‍या अनेक लोकांनी भरपूर उत्पन्न मिळवलेले आहे. नुकतेच हैदराबादेतील एक कोट्याधीश उद्योगपती मन्नम मधुसुदन राव यांच्या आयुष्यावरचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्या पुस्तकात या दलित समाजातल्या कोट्याधीश उद्योगपतीची माहिती दिलेली आहे. अतीशय विपण्णावस्थेत जगणारे एम.एम. राव हे खड्डे खोदून त्यात टेलिफोनच्या केबल्स् टाकण्याचे काम करत होते. मात्र एकेदिवशी हे काम करत असतानाच आपल्या दोन अधिकार्‍यांचे बोलणे त्यांनी ऐकले. हे केबल अंथरण्याचे काम एखाद्या लेबर कॉन्ट्रॅक्टरवर सोपवून दिले तर बरे होईल, कामाची देखरेख करण्याचे आपले कष्ट वाचतील असे ते बोलत होते. ते ऐकून एम.एम. राव यांनी त्या अधिकार्‍याची भेट घेतली आणि आपल्याला लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती केली. त्यांच्यासोबत काम करणारे काही मजूर आणि ओळखीचे काही मजूर यांना एकत्र करून त्यांचे कॉन्ट्रॅक्टर म्हणून एम.एम. राव यांनी ते केबल अंथरण्याचे काम स्वीकारले आणि त्यावर देखरेख करण्याची जबाबदारी सुद्धा घेतली. त्यातून त्यांना चांगली प्राप्ती झाली. अन्य राज्यातली कामेही मिळाली. त्यावर त्यांनी तीन वर्षात अडीच कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला. तो बंगला त्याच भागात होता, तिथे ते सुरुवातीला मजूर म्हणून काम करत होते.

Leave a Comment