रहस्य आनंदाचे

health
जगात प्रत्येक माणसाला आकृष्ट करणारी कोणती एक गोष्ट असेल तर आनंद ही होय. प्रत्येक मानवी प्राणीच काय पण जंगली प्राणी सुद्धा आनंदी आणि सुखी होण्यासाठी धडपड करत असतात. कितीही धडपड केली तरी प्रत्येकाला आनंद आणि सुखाची प्राप्ती होईलच याची खात्री नसते. मात्र सुखी आणि आनंदी होण्याचे रहस्य काय, असा प्रश्‍न प्रत्येकाला पडलेला असतो. ते रहस्य प्रत्येकाला अवगत झाले नाही तरी काही लोकांना झालेले असते. ते रहस्य नेमके काय आहे हे सांगितलेही जात असते. परंतु तरी सुद्धा सगळेच लोक आनंदी होत नाहीत.

याचे महत्वाचे कारण म्हणजे आनंदी होणे आणि सुखी होणे ही एका विचार पद्धतीची परिणती असते आणि ही विचाराची प्रक्रिया हा बुद्धीमत्तेचा परिपाक असतो. बुद्धीमत्ता तीव्र नसेल आणि विचार करण्याची क्षमता नसेल तर माणूस सुखी होत नाही. अशी बुद्धीमान आणि म्हणूनच सुखी, आनंदी असणारे लोक नेमके काय करतात हे काही लोकांनी जाणून घेतलेले आहे.

असे लोक स्वत:वर प्रेम करतात. शिवाय आपल्या आयुष्यामध्ये शाश्‍वत काही नसते हे त्यांना माहीत असते. त्यामुळे अशाश्‍वत गोष्टींचा नाश झाला म्हणून ते दु:खी होत नाहीत. अशाश्‍वत गोष्टी या नष्ट होतच असतात, ती निसर्गात चालणारी एक प्रक्रिया असते. तेव्हा वापरायची एखादी वस्तू तुटली, फुटली, मोडली किंवा हरवली म्हणून ते दु:खी होत नाहीत. अविचारी आणि विचारी लोकांत हाच फरक असतो.

असे लोक स्वप्ने बघतात. त्यांच्या काही इच्छा असतात, परंतु त्या इच्छा आणि स्वप्ने अर्धवट राहिली म्हणून ते कधीच पश्‍चात्ताप करत नाहीत. लोकांनी आपल्यावर प्रेम करावे असा त्यांचा अट्टाहास नसतो. त्यांना कोणी नाकारले तर ते हाय हाय करत नाहीत, उलट असा नकार ते संरक्षण म्हणून स्वीकारतात. ते आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात आणि ते आपले सामाजिक वर्तुळ वाढविण्याचा सतत प्रयत्न करत असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment