बाष्पीभवन टाळता येते

clouds
महाराष्ट्रामध्ये मर्यादित स्वरुपाचा पाऊस आहे. त्यामुळे पावसाळ्यात पडलेले पाणी साचवून ठेवून नंतर ते आठ महिने वापरण्याची पद्धती अवलंबिणे आवश्यक ठरते. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शेतीमध्ये धरणे, जलाशये, तलाव, विहिरी यांना जास्त महत्व आहे. या जलाशयातले पाणी कोणाच्या मालकीचे, असा प्रश्‍न सध्या निर्माण झाला आहे. ते पाणी शेतकर्‍यांचे, शहरातल्या लोकांचे की उद्योगधंद्यांचे? असा वाद निर्माण झाला आहे. शेतकर्‍यांना तर पाणी दिलेच पाहिजे, कारण त्यांच्यासाठीच धरणे बांधलेली असतात. शहरांचीही वाढ होत चालली आहे. त्यांनाही पाणी लागते, नाही म्हणता येत नाही. उद्योगासाठीही पाणी लागतेच. देशाचा औद्योगिक विकास वेगाने होत आहे. त्यामुळे उद्योगांनाही पाणी दिले पाहिजे. पाणी सर्वजणच मागत आहेत. पण मागणी वाढली म्हणून पाणी काही वाढत नाही. यावर उपाय काय ? या पाण्यावर हक्क सांगणार्‍या या तीन भागिदारांशिवाय आणखी एक भागिदार आहे, तो म्हणजे सूर्य. आपल्या भागात पडणार्‍या पावसापैकी बरेचसे पावसाचे पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे आणि उन्हामुळे म्हणजे बाष्पीभवन होऊन उडून जाते. धरणातल्या पाण्याचा ३० ते ४० टक्के हिस्सा बाष्पीभवनाने उडून जात असतो.

सुप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ अरुण देशपांडे यांनी पाण्याचे ऑडीट करणार्‍या एका लेखामध्ये, धरणांना उद्देशून, येथे पाणी वाळत घातलेले आहे असे मार्मिक वर्णन केलेले होते. पाण्याचा बराच मोठा हिस्सा जर उन्हाने उडून जात असेल तर आगामी काळामध्ये पाण्याच्या नियोजनात हे बाष्पीभवन कमी कसे होईल, यावर सर्वाधिक भर दिला गेला पाहिजे. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या मोहिमेमध्ये जमिनीवर पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब जसा जिरवण्यावर भर दिला जातो तसाच भर येत्या काही वर्षांमध्ये पडलेला एकही थेंब उन्हाने किंवा वार्‍याने बाष्पीभवन होऊन उडून जाणार नाही यावर द्यावा लागणार आहे. साठवलेल्या पाण्यावर काही विशिष्ट तेलांचे तवंग सोडल्यास त्या पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. शेततळी बांधणार्‍या शेतकर्‍यांनी अशा तेलाचा वापर करायला हरकत नाही. आपण शेतामध्ये विशेषत: ङ्गळबागांना पाणी देतो. तेव्हा दोन झाडांच्या मधल्या भागातील जमीन तापते आणि तिच्यामुळे सुद्धा पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे ङ्गळबागा किंवा अन्य शक्य असेल त्या पिकांमध्ये जमीन तापू नये याकरिता आच्छादन टाकण्याची कल्पना पुढे आलेली आहे. शेतामध्ये वाया जाणारे गवत, काडी कचरा किंवा उसाचे पाचट यांचा वापर अशा आच्छादनासाठी करता येऊ शकतो. त्यातून आपण पाण्याचा अपव्यय टाळू शकतो.

आपल्याला पाणी कमावणे शक्य नाही. निदान ते कमीत कमी गमवावे म्हणजे ते कमावल्यासारखेच आहे. ते कमावण्याचा एक मार्ग म्हणजे हे आच्छादन. पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी आणखी एक उपाय करता येतो. आपल्या शेतामध्ये वारा कोणत्या दिशेने वाहतो हे बघून वार्‍याच्या दिशेला बांधावर झाडे लावली तर त्या झाडांमुळे एक संरक्षक भिंत उभी राहते आणि वारे अडवले जाऊन, वार्‍यामुळे होऊ पाहणारे बाष्पीभवन टाळण्यास मदत होते. शेतकर्‍यांच्या अडचणी वाढण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे एकत्रितपणे येऊन कामे न करण्याची प्रवृत्ती. त्यामुळे आपण संघटितही होत नाही आणि अनेक सामूहिक कामे टाळतो. मात्र पाण्याचे नियोजन करायचे असेल तर केवळ स्वत:च्या शेतात ते करून चालत नाही. संघटितपणे ओढे, नाले अडवून किंवा गावाच्या शेजारी पाझर तलाव खोदून करावे लागते. २००२ साली गुजरातमध्ये सलग तीन वर्षे दुष्काळ पडला. अनेक गावे पाणी टंचाईमुळे उठायला लागली आणि गावात पाण्याचा थेंब आढळत नसल्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छमधल्या अनेक शेतकर्‍यांनी स्थलांतरे केली. मात्र त्यावेळी राज्य सरकारने गावाच्या शेजारी पाझर तलाव खोदण्याची मोहीम सुरू केली. कित्येक गावांमध्ये गावकर्‍यांनी एकत्रित येऊन श्रमदानाने पाझर तलाव खोदले.

या पाझर तलावांमुळे जे काही कमी-जास्त पावसाचे पाणी पडले असेल ते पाणी तिथे अडवले गेले आणि या पाण्यामुळे जमिनीत पाण्याचा झिरपा चांगला होऊन विहिरींना पाणी यायला लागले. आता या भागातले काही शेतकरी आपल्या गावी परत यायला लागले आहेत. अशा प्रकारच्या पाझर तलावांना चेक डॅम असे म्हणतात. सुप्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी या गावी किंवा हिवरे बाजार येथील श्री. पोपटराव पवार यांनी दुसरे तिसरे काही केलेले नाही. त्यांनी आपल्या गावातले पाणी अडवण्याचा आणि जिरवण्याचाच प्रयोग केलेला आहे. पण या प्रयोगाने त्या गावांचे रुप बदलून गेले आहे. महाराष्ट्रात ङ्गार पूर्वी श्री. शरद पवार यांनी अशा प्रकारचे बांध श्रमदानातून तयार करण्याच्या कामाला गती दिलेली होती. त्यांच्या नंतर त्यांचे अनुकरण करीत अकलूजचे युवा नेते खासदार श्री. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून श्रमदानातून असे तलाव खोदून घेतलेले आहेत. तसे पाहिले असता असे तलाव खोदणे हे सरकारचे काम आहे. परंतु ‘सरकारी काम सहा महिने थांब’ अशी म्हण आपल्याकडे रूढ झालेलीच आहे. मात्र तिच्यात बदल करून आता स्थिती ङ्गार वाईट झालेली आहे.‘सरकारी काम आणि वीस वर्षे थांब’ अशी वस्तुस्थिती आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. ती बदलली पाहिजे. याविषयी काही वाद नाही. परंतु सरकारी कामे तातडीने होतील असे या व्यवस्थेमध्ये बदल करणे आता तरी शक्य नाही.

कदाचित काही म्हणजे पन्नास एक वर्षांनी तसा काही बदल झालाच तर अजगरासारखी सुस्त पडलेली ही नोकरशाही थोडी जागी होईल सुद्धा. पण आता नाही. पुढे कधी तरी हे घडेल. मात्र ते घडेपर्यंत आपण आपल्या गावातले हे अनमोल जलधन असे वाया घालवणार आहोत का ? थोडे श्रमदान करून आणि थोडेसे सामूहिकपणे प्रयत्न करून गावाचे नशीब बदलत असेल तर आपण सरकारची वाट पहात थांबणार आहोत का ? याचा विचार प्रत्येक गावातल्या तरुणांनी केला पाहिजे आणि आपल्या भविष्यासाठी गावकर्‍यांना एकत्रित करून हा पुरुषार्थ करून दाखवला पाहिजे. श्री. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तर गावोगाव दौरे करताना तिथल्या तरुणांना, देशासाठी एक तास द्या, एवढेच आवाहन केले होते. मात्र यामागची भावना लक्षात येताच तरुण पुढे सरसवायला लागले आणि एक तासच का एक दिवस देतो, असे म्हणून श्रमदानास सिद्ध व्हायला लागले. करोडो रुपये खर्चून सरकारकडून वर्षानुवर्षे जे काम होणार नाही ते काम थोडेसे मनापासून आणि सामूहिक भावनेने केले की, काही तासात होते. सामूहिक शक्तीचा तो चमत्कार वाटावा असा आविष्कार असतो. हे कोणत्याही गावात घडू शकते. शेतातल्या पाण्याचे नियोजन इतर कोणावरही अवलंबून न राहता स्वत:च करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे विहिरीचे पुनर्भरण. सध्या विहिरीचे पाणी ङ्गार खोल चालले आहे. पावसाळ्यात विहिरी बर्‍यापैकी भरलेल्या असतात, पण हिवाळ्यात खोल खोल जायला लागतात आणि उन्हाळ्यात तर विहिरीतल्या मोटारी वरचेवर खाली खाली न्याव्या लागतात. आणखी पाणी मिळावे म्हणून विहिरींच्या आत सरळ किंवा आडवे बोअर घेण्याचा प्रयत्न केला जातो.

सध्या पावसाळ्यात सुद्धा विहिरी पुरेशा भरेनाशा झाल्या आहेत. एक दोन पावसात तर विहिरींना पाणी येतच नाही. पोळ्यापर्यंत बर्‍यापैकी पाऊस पडतो आणि मग एकदोन मोठे पाऊस पडल्यावर जमिनीचा खडा ङ्गुटून विहिरींना पाणी यायला लागते. दसर्‍याला विहिरी भरतात. पण असेच होत असले पाहिजे असे काही नाही. विहीर पुनर्भरणाचे प्रयोग करून आपण आपली विहीर लवकर भरेल अशी सोय करू शकतो. त्यासाठी काही ङ्गार मोठे अवघड तंत्र अवलंबावे लागत नाही. विहिरी पासून १० ते १२ ङ्गूट अंतरावर ६ ङ्गूट लांब, ६ ङ्गूट रुंद आणि ६ ङ्गूट खोल खड्डा घ्यावा. या खड्ड्याच्या तळाला एक आडवा पाईप घालून तो पाईप विहिरीत सोडावा. म्हणजे खड्ड्यातले पाणी विहिरीत जाईल. खड्डा आणि विहीर यांना जोडणारा हा पाईप मोठा म्हणजे सव्वा ङ्गूट व्यासाचा असावा. या खड्ड्यात तळाला सव्वा ङ्गूट मोठ्या दगडांनी भरावा. नंतर एक ङ्गूट थर लहान गोट्यांनी भरावा. नंतरचा चार इंचाचा थर जाड वाळूने भरावा. त्यावरचा ९ इंचाचा थर बारीक वाळूने भरावा. उरलेली जागा पाणी येण्यासाठी मोेकळी ठेवावी. शेतातून वाहून येणारे किंवा शेततळ्यात साचलेले किंवा शेताजवळच्या नदी नाल्यातले पाणी या गाळण खड्ड्याकडे वळवून, या खड्ड्यात घ्यावे. ते या खड्ड्यात गाळले जाते आणि स्वच्छ पाणी विहिरीत भरले जाईल. विहिरीच्या पाण्याची पातळी लवकर वाढेल. विहिरीच्या आत असलेल्या भेगांतून हेच पाणी जमिनीतही मुरेल. जमिनीच्या भेगात ते साठून राहील.

विहीर उताराला असल्यास हे सहज शक्य आहे. पण विहीर उंचावर असला तरी अशा विहिरीच्या खालच्या भागात खड्ड्यातील पाईप सोडावा. अशाच पद्धतीने बोअरमध्येही पाणी साठवता येते. उन्हाळा आला की अनेक गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. मग या गावातल्या महिला दोन-दोन तीन-तीन किलोमीटरवरून डोक्यावर पाणी आणतात. मग कधीतरी गावातले लोक एक पुढारी बघून त्याच्या मार्ङ्गत जिल्हा परिषदेत अर्ज करून बोअरची मागणी करतात. काही गावात बोअर असते पण ते आटलेले असते. असे झाले की गावातले लोक हात अपेष्टा सहन करतात. पण तशा त्या सहन करण्याची काही गरज नाही. हे त्यांना कोणी सांगत नाही. गावकर्‍यांच्या घरांच्या छपरावरचे पाणी पावसाळ्यात वाहून जाते. त्याऐवजी तेच पाणी बोअरजवळ गाळण हौद तयार करून त्याचे पाणी बोअरमध्ये सोडले तर बोअरला पाणीच पाणी लागते. हे ङ्गार अवघड नाही. पण तसे कोणी करीत नाहीत. कारण इच्छाशक्तीचा अभाव आणि सामूहिक शक्तीचे अज्ञान. सर्वांनी मिळून केलेले असे एक काम छान झाले की गावाला संघटित कामे करण्याचा छंदच लागतो. बघा तरी करून.

Leave a Comment