पाण्याचे नियोजन सर्वात महत्वाचे

water
शेतीमध्ये पाण्याचे नियोजन सर्वाधिक महत्वाचे असते आणि ते सर्वात अवघडही असते. कारण पाणी आपल्या स्वाधीन नाही, ते निसर्गाच्या स्वाधीन आहे. त्यामुळे निसर्गातून जेवढे काही पाणी मिळेल त्याचे चांगले नियोजन करून त्याचा अधिकाधिक उत्पादक वापर करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागतो. साधारणपणे पाण्याची चर्चा सुरू झाली की, अनेक लोक, विशेषत: केस पांढरे झालेले लोक, आजकाल पाऊसच कमी झाला आहे अशी तक्रार करायला लागतात. या तक्रारीत तथ्य नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पाऊस कमी झाला की जास्त झाला हे अंदाजपंचे सांगण्याची गरजही नाही. पाऊस मोजता येतो आणि वर्षानुवर्षे तो मोजलाही गेला आहे. त्यामुळे पावसाच्या शंभर वर्षातल्या नोंदी उपलब्ध आहेत. त्यावरून तरी पावसात ङ्गार मोठी घट झालेली नाही, असा दावा शास्त्रज्ञ मंडळी करीत आहेत आणि त्यात तथ्यही आहे. काही लोकांना मात्र हे मान्य नाही. त्यांच्या मते पाऊस कमी झालाच आहे.

एकवेळ आपण हे मान्यही करू की, पाऊस काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र जे लोक पावसाविषयी अशी तक्रार करतात त्यांना त्यांचा असे म्हणण्यामागचा हेतू वेगळा असतो. आजकाल शेती पिकतच नाही, पूर्वी ङ्गार छान पिकत होती आणि आता पाऊस नसल्यामुळे ती कमी पिकायला लागली आहे, अशी सबब त्यांना सांगायची असते. यात मात्र अजिबात तथ्य नाही. पाऊस कमी पडला म्हणून शेती कमी पिकण्याचे काहीही कारण नाही. कारण पाऊस भरपूर पडला तर शेती छान पिकते आणि कमी पडला तर ती पिकत नाही, असे काही आजवर आढळलेले नाही. समजा आमच्या गावात आमच्या आजोबाच्या काळी ४० इंच पाऊस पडत होता. तक्रार करणार्‍या लोकांच्या मते तो कमी झाला आहे. म्हणजे आपण असे गृहित धरू की, तो आता ३८ इंच झालेला आहे. मग ४० इंचाचा पाऊस ३८ इंचावर आला म्हणजे शेती न पिकायचे कारण काय ? ३८ इंचात शेती होत नाही का ? ज्या भागात ३८ इंच सुद्धा पाऊस पडत नाही तिथे छान शेती होतेच की नाही ? मग तिथे जर ती होत असेल तर आपल्याकडेही ती झालीच पाहिजे.

४० इंचाचा पाऊस ३८ इंचावर आला म्हणून शेतीवर परिणाम व्हायचे काहीच कारण नाही. शेतकर्‍यांनी आपल्या शेतावर पडणारा पाऊस नेमका किती आहे याचा एकदा हिशोब केला पाहिजे. ४० इंच पाऊस म्हणजे किती पाऊस ? आपल्या शेताचे क्षेत्रङ्गळ किती ? त्यावर ४० इंच पाऊस पडतो म्हणजे तो एकूण किती झाला आणि त्यातला जमिनीत किती मुरला? वाहून किती गेला ? आणि आपण किती लिटर पाणी वापरले ? याचा हिशोब ठेवला पाहिजे. असा हिशोब ठेवल्यानंतर आपल्या असे लक्षात येईल की, साधारण १० ते १२ इंच पाऊस पडला तरी तो चांगली शेती करायला उपयुक्त ठरतो. तो तसा का ठरतो आणि त्यासाठी आपण काय केले पाहिजे ? याचा कार्यक्रम ठरविण्यासाठी पाण्याचा असा हिशोब मांडणार्‍या आणि थेंबा थेंबाचा विनियोग करणार्‍या शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या पाहिजे. त्यांचे विचार जाणून घेतले पाहिजेत. उत्तम शेती करण्याची सुरुवात पाण्याच्या अशा हिशोबाने होत असते.

Leave a Comment