किम जोंगचा नवा फतवा; त्या लोकांना दिसताच क्षणी गोळ्या घाला


प्योंगप्यांग – आपल्या देशामध्ये एकही कोरोनाबाधितच रुग्ण नसल्याचा दावा उत्तर कोरियाने केला आहे. देशामध्ये कठोर निर्बंध लादल्यामुळे कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचा दावा उत्तर कोरियाने केला आहे. पण आता शत्रू देशाकडून उत्तर कोरियात कोरोनाचा फैलाव केला जाण्याची भीती उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उनला वाटत असल्यामुळेच देशातील सीमांवरील सुरक्षा आणखीन वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. देशांच्या सीमांजवळ बफर झोन तयार करण्यात आले आहेत.

एका पोलीस आदेशाच्या आधारे उत्तर कोरियामधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या बफर झोनमध्ये परवानगी न घेता फिरणाऱ्यांना कोणताही इशारा न देताना थेट गोळी घालण्यात येईल. त्याचप्रमाणे उत्तर कोरियाच्या सीमेजवळ असणाऱ्या नद्यांमध्ये किंवा त्या नद्यांच्या किनाऱ्यांवर दिसणाऱ्या व्यक्तींना कोणतीही पूर्व सूचना न देता गोळी घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. पण कायद्याच्या जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार कोणतीही पूर्व सूचना न देता आपल्या देशाच्या सीमेबाहेरील हद्दीतील व्यक्तींना दिसताच गोळी मारण्याचा आदेश देणे हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांचे उल्लंघन आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा यंत्रणांच्या सांगण्यानुसार, बळ तसेच अग्निबाणांचा उपयोग करण्याआधी असहिंकपद्धतीने प्रकरण हाताळण्यात यावे. पण शस्त्र वापरण्याची वेळ आलीच तर अशावेळी अधिकाऱ्यांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसार निर्णय घेणे गरजेचे असते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा नियमानुसार दिसताच गोळी मारण्याचा आदेश स्वीकारुन गोळीबार करणाऱ्या सुरक्षारक्षकांबरोबरच त्यांना आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांनाही हत्येसाठी जबाबदार ठरवले जाते.

दुसरीकडे बफर झोनमध्ये उत्तर कोरियाने भूसुरुंग पेरल्याचे सांगितले जात आहे. रेडिओ फ्री एशियाशी बोलताना सैन्याशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, या महिन्याच्या सुरुवातीपासून आम्ही सर्वोच्च आदेशानुसार उत्तर कोरिया आणि चीनच्या सीमेजवळच्या रयांगगंग प्रांतामध्ये भूसुरुंग पेरत आहोत. उत्तर कोरियाच्या लष्कराला हे सर्व करण्यासाठी १५ दिवसांहून कमी कालावधी लागला. पण यादरम्यान झालेल्या एका स्फोटामध्ये अनेक सैनिक जखमी झाले तर काहींचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहे.