भाजपने केली एमआयएमच्या दोन आमदारांना अटक करण्याची मागणी


मुंबई – भारताचे बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे नागरिकत्व मिळवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलीसांनी याप्रकरणी एका टोळीला अटक केली आहे. एमआयएमच्या दोन आमदारांचे सही असलेले लेटरहेड त्यांच्याकडे आढळले आहेत. पोलीसांनी ते जप्त केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दोन्ही आमदारांना अटक करा, अशी मागणी केली आहे. एमआयएमच्या त्या दोन आमदारांची शेख असिफ शेख रशीद आणि मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलील अशी नावे आहेत.

एमआयएमच्या आमदाराचे लेटर हेड बांगलादेशींना नागरिकत्व मिळवून देण्यासाठी वापरले आहेत. देशाच्या सार्वभौमत्व व सुरक्षेशी अत्यंत धाकादायक खेळ करणाऱ्या देश विघातक षड्यंत्राची कसून चौकशी करा. अशा देशद्रोह्यांना अटक करा, अशा आशयाचे ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे. देशातील विविध शहरांमध्ये राहणाऱ्या बांगलादेशींना एमआयएमचे आमदार शेख असिफ शेख रशीद आणि मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलील यांच्या लेटरहेडचा वापर करून भारतीय नागरिकत्व मिळवून देण्याचे काम सर्रासपणे सुरू होते. एमआयएम आमदारांची 7 कोरी लेटरहेडदेखील अटक करण्यात आलेल्या टोळीकडे सापडली आहेत. हा अत्यंत धोकादायक आणि घातक प्रकार आहे. त्यामुळे त्या दोन्हीही आमदारांना तातडीने अटक करा, असेही भातखळकर म्हणाले आहेत.