एकनाथ खडसेंच्या आमदारकीला अंजली दमानियांचा विरोध, घेतील राज्यपालांची भेट


मुंबई : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदारांच्या यादी जवळपास निश्चित झाली असून राष्ट्रवादीत भाजपमधून दाखल झालेले एकनाथ खडसे यांचीही राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत वर्णी लागली आहे. पण सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे.

राष्ट्रवादीकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी एकनाथ खडसे यांचे नाव पाठवण्यात आले आहे. 1 नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भेट घेतली आणि एकनाथ खडसे यांच्या नावाला त्यांनी विरोध केला. यादीत खडसेंचे नाव येणे हे संतापजनक आहे. भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर आहे. पुन्हा एकदा राजकारणात भ्रष्टाचारी नेत्याला आणले जात आहे. जर खडसे हे पुन्हा राजकारणात सक्रिय झाले, तर भ्रष्टाचाराविरोधी लढ्याला काही अर्थ राहणार नसल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर पोलिसांत एकनाथ खडसे यांच्याविरोधात तक्रार केली होती, पण कोणताही गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात न आल्यामुळे न्यायालयात आणखी लढा द्यावा लागणार आहे. आपण खडसे यांच्याविरोधात आणखी पुरावे गोळा करुन ते राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचेही दमानिया यांनी सांगितले.