४० तास तेवणारा जादूई दीप

फोटो साभार देवभूमी मिडिया

दिवाळी दिव्यांचा सण. आता हा सण अगदी तोंडावर आला आहे. घरोघरी या काळात दिवे, पणत्या लावल्या जातील. छतीसगढ़च्या बस्तर या आदिवासी भागातील कुंभार पाड्यात अशोक चक्रधर यांनी तयार केलेला मातीचा एक दिवा अतिशय लक्षवेधक ठरला आहे. या दिव्यात एकदा तेल घातले की तो सलग ४० तास तेवतो. विशेष म्हणजे आपला हा जादुई दिवा आकर्षणाचे केंद्र ठरला आहे याची अशोक याना कल्पना नव्हती पण जेव्हा त्यांच्याकडे या दिव्यासाठी खूप मागणी येऊ लागली तेव्हा त्यांना समजले की या दिव्याची माहिती कुणीतरी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

अशोक बालपणापासून कुंभार काम करतात आणि ते नॅशनल मेरीट अवॉर्ड विजेते आहेत. त्यांनी या प्रकारचा दिवा ३५ वर्षापूर्वी पाहिला होता. वंश परंपरेने ही कला त्यांना मिळाली आहे. या अनोख्या दिव्यासाठी त्यांना दररोज ५०-६० ऑर्डर मिळत आहेत. या दिव्याची किंमत २०० ते २५० रुपये आहे.

या दिव्याचा खालचा भाग गोलाकार पणतीप्रमाणे आहे. तेथे वात लावायची. वरचा भाग चहाच्या किटलीप्रमाणे दिसतो ही किटली उलटी बसविली गेली आहे. वरच्या भागात तेल भरले की अगदी छोट्या नळीतून ते खालच्या दिव्यात पडते आणि खालची पणती भरली की वरून तेल येण्याचे थांबते. यामध्ये काहीही जादू नाही तर विज्ञान आहे. या दिव्याला आतून एक छिद्र आहे त्यातून हवा जाते आणि वरच्या भागात भरलेल्या तेलाला वरून दाब देते त्यामुळे तेल खालच्या दिव्यात येते. तेल पूर्ण भरले की हे छिद्र बंद होते आणि हवेचा दाब न राहिल्याने तेल खाली येण्याचे थांबते. तेल कमी होऊ लागले की पुन्हा छिद्र उघडे होते, हवा आत जाते आणि पुन्हा तेल बाहेर येऊ लागते.