सुवर्णपदक विजेते का चावतात आपले पदक ?

medal
नुकत्याच राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगो येथे पार पडल्या. दर चार वर्षांनी ऑलिंपिक स्पर्धा भरविल्या जात असतात. अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धांतून सुवर्णपदक मिळविण्याचा क्षण त्या खेळाडूसाठी अविस्मरणीय असा असतो. सुवर्णपदक स्वीकारताना त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून जाणारा आनंद प्रेक्षकाच्या मनातही अलगद झिरपतो आणि हा सुवर्णक्षण कॅमेर्‍यात बंद करण्याची एकच घाई छायाचित्रकरांना होते.

हे बक्षीस समारंभ पाहताना अनेक वेळा आपण पाहतो की सुवर्णपदक विजेता आपले पदक दाताने चावतो. त्यामागचे कारण मात्र मजेशीर आहे. सुवर्णपदक विजेत्याने ते पदक दातात चावले पाहिजे असा कांही कोणत्याही क्रीडा संघटनांचा नियम नसतो. मात्र अनेकवेळा फोटोसाठी फोटोग्राफर पदक दाताने चावायला खेळाडूंना सांगतात.

त्यामागची हकीकत अशी सांगितली जाते की फार पूर्वीपासून सोन्याचा खरेपणा पडताळून पाहण्यासाठी ते दाताने चावण्याची पद्धत आहे. शुद्ध सोने अतिशय नरम असते. ते चावले तर त्याच्यावर दाताच्या खुणा सहज उमटतात. आपल्याला मिळालेल्या मेडल किती खरे आहे हे पाहण्यासाठी ते दाताने चावण्याची पद्धत पडली असावी. आणि आता ही रूळलीही आहे. वास्तविक आता देण्यात येणारी मेडल शुद्ध सोन्याची नसतात.१९१२ पासून या मेडलमध्ये ६ ग्रॅम सोन्याचा मुलामा चढविण्याची पद्धत रूढ झाली.

सध्याचे ऑलिंपिक मेडल मात्र स्टर्लिंग चांदीचे असते आणि त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला असतो. चांदीही दातांसाठी नरम आहे. त्यामुळे खेळाडूंना आपल्यला मिळालेले मेडल शुद्ध सोन्याचे नाही याची पूर्ण कल्पना असते तरीही ते चावून पाहण्याचे नाटक केले जाते असे सांगितले जाते.

Leave a Comment