या देशातील तुरुंगात आयात होतात कैदी  

फोटो साभार इनडीपेंडन्ट

आपण अनेक प्रकारच्या दुष्काळाबद्दल ऐकतो. अन्न धान्याचा दुष्काळ, पाण्याचा दुष्काळ, शुद्ध हवेचा दुष्काळ, अगदी अकलेचा दुष्काळ असेही बरेचदा ऐकायला मिळते. पण जगात एक देश असाही आहे जेथे कैद्यांचा दुष्काळ आहे. त्यामुळे बाहेरच्या देशातील कैदी येथे आणून तुरुंगात ठेवले जातात.

हा देश आहे द नेदरलँड्स. या देशातील तुरुंग एकदम सुनसान झाले आहेत कारण येथे कैदी नाहीत. याचा अर्थ या देशात अजिबात गुन्हे घडत नाहीत असे मात्र नाही. अर्थात गुन्ह्याचे प्रमाण खुपच कमी आहे आणि त्यातूनही गुन्हेगारला तुरुंगवासाची शिक्षा झाली तरी त्याला फार काळ तुरुंगात ठेवले जात नाही. तर शक्यतो लवकरात लवकर बाहेर काढून समाजात समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न केले जातात. या देशातील जनता शहाणी, आणि नियम कायदे पाळणारी आहे त्यामुळे गुन्ह्याचे प्रमाण १ लाखामागे जेमतेम ६१ इतके आहे.

कैदी नसले तरी तुरुंग बंद करण्याची मात्र सरकारची तयारी नाही पण त्यामागचे कारण वेगळे आहे. तुरुंग बंद केले तर तुरुंगात काम करणाऱ्या दोन हजार कर्मचाऱ्यांचा रोजगार बंद होईल म्हणून तुरुंग सुरु ठेवले गेले असून शेजारील नॉर्वे मधून येथे कैदी आणले जातात. नॉर्वे मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण खूप आहे पण तेथे कैद्यांना ठेवण्यासाठी तुरुंग कमी आहेत. त्यामुळे २०१५ सालापासून नॉर्वे त्यांचे कैदी या तुरुंगात पाठवित आहे.