मातीची सुपीकता

farming
आपल्या मातीला आपण काळी आई मानतो, म्हणजेच तिला एक सजीव घटक समजतो. त्यामुळे तिच्यावर वारंवार किती वेळा पिकांच्या पोषणाची जबाबदारी टाकावी याचा विचार करण्याची गरज आहे. सध्या लोकसंख्या वाढत आहे आणि देशातली जमीन मात्र आहे तेवढीच आहे. लोकसंख्या वाढली म्हणून जमिनीचे क्षेत्र वाढत नसते. आपल्या देशाची लोकसंख्या पूर्वी २० कोटी होती. पूर्वी म्हणजे १९३० साली. त्यावेळी भारताची एकंदर जमीन जेवढी होती तेवढीच आता राहिलेली आहे. लोकसंख्या मात्र ६ पटीने वाढली आहे. म्हणजे आहे त्या जमिनीवर सहा पट अधिक लोकांच्या भरण-पोषणाचा भार पडलेला आहे. याचा अर्थ असा की, या जमिनीला सहा पट अधिक धान्य निर्माण करावे लागत आहे. भारताची एकंदर जमीन १४ कोटी हेक्टर म्हणजे ३५ कोटी एकर एवढी आहे. हे क्षेत्र लागवडीखाली आलेल्या जमिनीचे आहे. त्याशिवाय राहण्यासाठी वापरली जाणारी जमीन जंगले आणि पडीक जमीन यांचे क्षेत्र मोजले तर ते सारे क्षेत्र ६० कोटी एकरापर्यंत जाते. याचा अर्थ असा की, भारतातल्या प्रत्येक व्यक्तीमागे अर्धा एकर जमीन उपलब्ध आहे आणि लागवडीयोग्य जमिनीचा विचार केला तर तीन व्यक्तीमागे एक एकर असे प्रमाण पडते. म्हणजे तीन लोकांच्या भरण-पोषणाची जबाबदारी एक एकर जमिनीवर येऊन पडते. भारताची लोकसंख्या खूप आहे, असे वारंवार म्हटले जाते. परंतु उपलब्ध जमिनीचा विचार केला तर भारतात दरडोई जमिनीची उपलब्धता जास्त आहे. भारताचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, भारतामध्ये लागवडयोेग्य जमिनीचे क्षेत्र जास्त आहे.

एकंदर उपलब्ध जमिनीपैकी किती टक्के जमीन लागवडीखाली येऊ शकते याला महत्व असते. भारत हा जगातला मोठा देश नाही. आकाराच्या दृष्टीने विचार केला तर भारताचा सहावा क्रमांक आहे. रशिया, अमेरिका, चीन, ब्राझील आदी काही देश भारतापेक्षा मोठे आहेत. मात्र रशियामध्ये दोन तृतीयांश भाग पडीक आहे. अमेरिका हा देश भारतापेक्षा तिप्पट मोठा आहे. पण त्याचे बरेच मोठे क्षेत्र हे वाळवंटाखाली आहे आणि जंगलाखाली आहे. चीनमध्ये एकंदर उपलब्ध जमिनीच्या २८ टक्के जमीन शेतीस योग्य अशी आहे. भारतात मात्र हे प्रमाण ५० टक्क्यापेक्षा जास्त आहे. चीन हा देश क्षेत्रङ्गळाने भारतापेक्षा जास्त असला तरी शेतीयोग्य जमिनीच्या बाबतीत भारत चीनपेक्षा आघाडीवर आहे. म्हणजे भारतात शेती करण्यास अनुकूल अशी स्थिती आहे. मात्र जमीन जास्त असली म्हणजे ती सगळी वापरलीच पाहिजे असे नाही. भारतात शेतासाठी वापरली जाण्यास योग्य असलेली सगळीच जमीन कसली जाते. १४ कोटी हेक्टरपैकी केवळ २ कोटी हेक्टर जमीन पडीक आहे, बाकी १२ कोटी हेक्टर जमीन शेतीखाली आणली जाते. काही शास्त्रज्ञांच्या मते हे योग्य नाही. काही जमीन अधूनमधून पडीक ठेवली पाहिजे, असे त्यांचे मत आहे. चीनमध्ये सगळी जमीन शेतीखाली आणली जात नाही. हा एक विचार आहे आणि तज्ञांनी तो करायचा आहे. मात्र आपल्याला जास्तीत जास्त जमीन का वापरावी लागते, याचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे.

पोषणद्रव्ये

आपली काळी आई पिकांचे पोषण करताना तिला पुरवण्यात आलेली पोषण द्रव्ये देत असते. आपण वर्षानुवर्षे त्याच त्या जमिनीत पिके घेत असतो. मग वारंवार पिके घेतल्याने आणि तिची पोषण द्रव्ये वापरली गेल्याने तिच्यातली पोषण द्रव्ये संपतात. संपायलाच हवीत. मग ती पुन्हा पुन्हा कशी उपलब्ध होतात ? अनेक शेतकरी आपल्या शेतात कसलीच खते टाकत नाहीत. असे लाखो शेतकरी आहेत. त्यांच्या शेतात त्यांनी चुकूनसुद्धा शेणखत टाकलेले नसते. त्यांना रासायनिक खतांची तर माहितीही नसते. खते वापरल्याशिवाय शेती चांगली होत नाही असे मानले जाते तर मग अशा खतांच्या बाबतीत पूर्ण अज्ञानी असणार्‍या शेतकर्‍यांच्या शेतात ही पिके येतात कशी ? खरे तर अशा शेतकर्‍यांच्या शेतात पिके ङ्गार चांगली येत नाहीत. त्या पिकांना ङ्गार चांगली पोषण द्रव्ये मिळत नाहीत. पण ती काही प्रमाणात का होईना मिळतात.

प्रश्‍न असा आहे की, कमी प्रमाणात का होईना मिळणारी ही पोषण द्रव्ये कोठून मिळतात ? शेती तज्ञांनी ही गोष्ट मान्य केली आहे की, आपल्या शेतीतल्या काही मशागतीच्या पद्धतीच शेतात खतांसारखे काम करीत असतात. जमिनीची मशागत हाही एक खतच असतो. कारण मशागतीमुळे जमिनीतल्या जिवाणूंच्या वाढीस अनुकूल स्थिती निर्माण होते आणि जिवाणूंची संख्या वाढली की, पीक चांगले येते. त्यामुळेच केवळ चांगली मशागत केली तरी चालते असे म्हटले जाते. अर्थात चांगली पिके येण्यास ही मशागत उपयोगी पडेलच असे नाही. चांगली पिके येण्यासाठी त्यापेक्षा अधिक काही तरी केले पाहिजे. वर्षानुवर्षे खते न वापरता शेती करून उत्पन्न काढणार्‍या शेतकर्‍यांना आणखी एका गोष्टीचा उपयोग होतो. तो म्हणजे पिकांचा ङ्गेरपालट. आपल्या शेतीतली काही पिके जमिनीतून अन्नाचा अंश केवळ ओढून घेणारी आहेत. तर काही पिके स्वत:ची वाढ होत असतानाच जमिनीत काही अन्नांश सोडून देणारी आहेत. त्यांनाच शेतकर्‍यांच्या भाषेमध्ये बिवड असे म्हणतात. अशा पिकांच्या मुळांच्या गाठीमध्ये नत्र अंश असतो. ही पिके घेतली म्हणजे त्या शेतामध्ये नत्र (नायट्रोजन) शिल्लक राहते आणि त्यानंतर कोणतेही पीक घेतले की, मातीत रािहलेले हे नत्र त्या पिकाला आपोआप उपलब्ध होते. असे नायट्रोजन सोडणारे द्विदल धान्याचे पीक एकदा घेतले की, त्यानंतर गहू, ज्वारी असे एकदल धान्य पीक घेतले जाते आणि असा ङ्गेरपालट करीत गेलो की, वर्षानुवर्षे बाहेरची कसलीही भरखते किंवा वरखते न घालता शेती करता येते. भारतातले बहुसंख्य शेतकरी याच पद्धतीने शेती करीत आलेले आहेत. त्यामुळे खतांवर खर्च न करता त्यांची शेती वर्षानुवर्षे अव्याहतपणे सुरू आहे.

असा ङ्गेरपालट उपयोगी पडतो हे खरे. परंतु त्यापासून जास्त उत्पन्न मिळत नाही. त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. त्यामुळे भारतातल्या शेतकर्‍यांनी, खते न घालता शेती होतच आलेली आहे तेव्हा खतांची गरज काय, या विचारातून बाहेर पडले पाहिजे आणि जमिनीची पोषण द्रव्यांची गरज नेमकी काय असते, याचा अभ्यास करून अधिकाधिक पोषण द्रव्ये देऊन चांगली पिके घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण तसा तो केला जात नाही, हे आपले दुर्दैव आहे. काळी आई सशक्त असेल तरच तिच्यावर पोसली जाणारी पिके सशक्त होणार आहेत, हे कधीही विसरून चालणार नाही.

जमिनीची उत्पादकता

आपण शेती करतो पण आपल्या देशातल्या बहुसंख्य शेतकर्‍यांच्या शेती व्यवसायाला अभ्यासाचा आधार नसतो. त्यामुळे आपल्या शेतीतून जास्तीत जास्त किती उत्पन्न निघू शकते आणि आपण किती उत्पन्न काढतो याचा या शेतकर्‍यांनी कधी तुलनात्मक विचारच केलेला नसतो. भारत हा कृषि प्रधान देश आहे पण या देशाचा दर एकरी उत्पन्नाच्या बाबतीत जगात ङ्गार खालचा क्रमांक आहे. शेतीला स्थिती अनुकूल असूनही शास्त्रशुद्ध रित्या शेती केली जात नसल्याने ही अवस्था निर्माण झालेली आहे. या बाबतचे काही आकडे जर ध्यानी घेतले तर आपले डोळे उघडतील. भाताच्या दर एकरी उत्पन्नाचे काही आकडे हाती आले आहेत त्यानुसार भारतात भाताचे दर एकरी उत्पादन आठ क्विंटल आहे. तेच उत्पन्न जपान मध्ये मात्र एकरी २५ क्विंटल आहे. या बाबतीत जगातल्या काही प्रमुख कृषि प्रधान देशांचा तौलनिक अभ्यास केला तर असे लक्षात येईल की भारत याबाबत सर्वात मागे आहे. पाकिस्तानचे दर एकरी उत्पादन ९ क्विंटल आहे.इजिप्त मध्ये हे उत्पादन २१ क्विंटल आहे तर अमेरिकेत २३ क्विंटल आहे. हे सगळे आकडे पाहिले म्हणजे आपण या संदर्भात किती मागे आहोत याचा बोध होतो. हाच प्रकार बटाटा, टोमॅटो, गहू याही पिकांच्या बाबतीत दिसून येतो. आपल्या देशात पाणी कमी आहे, आपल्या देशातली हवा चांंगली नाही, आपल्या देशात खतांचा तुटवडा आहे असे काही नाही. जगात शेतीत असे भरपूर उत्पन्न काढणारे देश आणि या यादीत सर्वात खाली असलेला भारत देश यांच्या हवामानात, पाण्याच्या उपलब्धतेत कसलाही ङ्गरक नाही.

उलट इस्रायल सारखा वाळवंटातला देेश याबाबत आपल्या पेक्षा आघाडीवर आहे. अनेकदा आपल्या देशातले शेतकरी पावसाच्या नावाने बोटे मोडताना दिसतात. पावसाळा ङ्गार लहरी झाला आहे. पडला तर पडतो नाही तर गुुंगारा देऊन जातो म्हणून आपली अवस्था वाईट आहे असे बहाणे सांगितले जातात पण, इस्रायल मध्ये तर वर्षानुवर्षे अत्यल्प पाऊस पडत असतो. तिथे १० इंचा पेक्षा अधिक पाऊस कधी पडतच नाही. अशी स्थिती असूनही तिथला शेतकरी ५० इंच पाऊस पडणार्‍या भारतातल्या शेतकर्‍यांपेक्षा चांगले उत्पन्न काढतो. तो जास्त माल तर पिकवतोच पण तो दर्जेदार असून सार्‍या जगात पाठवला जात असतो. भारतात टोमॅटोचे उत्पादन हेक्टरी कमीत कमी १५ टन होते. याबाबतीत काही शेतकरी काही विशेष प्रयत्न करताना दिसतात पण त्यांची मजल हेक्टरी ५० टनांच्या पुढे जात नाही. इस्रायल सारखा वाळवंटी देश मात्र टोमॅटोचे उत्पादन हेक्टरी ३०० ते ४००टन एवढे काढत असतो. आपल्या आणि त्यांच्या उत्पन्नातला हा ङ्गरक आपल्याला विचार करायला लावणारा आहे. आज अमेरिका हा जगातला सर्वात श्रीमंत देश झाला आहे. अमेरिकेतल्या जमिनीला निसर्गाने काही विशेष दान दिले आहे असे काही नाही. अमेरिका आणि भारत यांची हवामान आणि पाऊस याबाबत सर्वसाधारणत: सारखीच स्थिती आहे. आपण शेती करताना निदान आपल्याला हे आकडे तरी माहीत असावेत. तेवढे उत्पादन काढण्याचा प्रयत्न करणे वगैरे पुढचे प्रकार आहेत पण पहिल्या पायरीवर आपल्याला निदान एवढे तरी माहीत असायला हरकत नाही की जगात काही पुढारलेल्या देशातले दर एकरी उत्पादन भारताच्या किमान तिप्पट आहे.

Leave a Comment