फायदेशीर पण दुर्लक्षित रेशीम उद्योग

silk
महाराष्ट्रामधल्या शेतकर्‍यांना करता येण्याजोगा बर्‍यापैकी फायदेशीर असूनही दुर्लक्षित असलेला उद्योग म्हणजे रेशीम उद्योग. शेतकरीवर्ग सातत्याने दुष्काळाशी सामना करत असतो आणि हवामानामध्ये तसेच पर्यावरणामध्ये काही बदल झाले की त्या बदलांचा त्याला फटका बसतो. तो उद्ध्वस्त होतो. त्यावर पर्याय काय ? असा विचार सातत्याने सुरू आहे. शेतकर्‍यांना हवामानाचा फटका न बसणार्‍या काही उद्योगांची जोड देता आली तर सातत्याने बसणार्‍या फटक्यातून त्याची सुटका होऊ शकते. म्हणूनच असे काही उद्योग केले पाहिजेत की, जे त्याला या ङ्गटक्यातून वाचवतील. रेशीम उद्योग हा असा एक उद्योग आहे की, जो निसर्गाच्या ङ्गटक्यांना बळी पडत नाही. थोडा हवामानात बदल झाला की लगेच उपासमारीची पाळी आली असे काही रेशीम उद्योगात होत नाही. एका अर्थाने विचार केला तर रेशीम उद्योग हा शेतीच्या सहाय्याने केला जाणारा कापड उद्योगच आहे. परंतु महाराष्ट्रातल्या कृषी तज्ञांचे या व्यवसायाकडे बरेचसे दुर्लक्ष आहे.

हवामान, उष्णतामान, पाऊस, ऊन या सार्‍या गोष्टींचा विचार केला असता महाराष्ट्रातले हवामान रेशीम उद्योगाला अनुकूल आहे. १९ व्या शतकाच्या शेवटी कधीतरी कोणा तज्ञाने महाराष्ट्र हे रेशीम उद्योगाला अनुकूल राज्य नाही असा शेरा मारला आणि त्यानंतरची कित्येक वर्षे महाराष्ट्रात रेशीम उद्योग वाढविण्यासाठी काही प्रयत्नच झाले नाहीत. यातून जे काही थोडेबहुत प्रयत्न झाले त्यांना ङ्गारसा प्रतिसाद मिळाला नाही. आपल्या शेजारच्याच कर्नाटकात मात्र रेशीम उद्योगाला भरपूर चालना दिली गेली. त्यामुळे तिथे हजारो शेतकरी रेशीम उद्योगावर जगत आहेत. भारतातल्या एकूण रेशीम उत्पादनातील ७५ टक्के उत्पादन एकट्या कर्नाटकात केले जाते. महाराष्ट्र याबाबतीत फारच मागे आहे. वास्तविक पाहता कर्नाटक आणि महाराष्ट्र ही दोन शेजारी राज्ये आहेत. त्यांच्या हवामानात फारसा फरक नाही. तेव्हा कर्नाटक मात्र या उद्योगात आघाडीवर राहते आणि महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यात सुद्धा येत नाही. यामागे केवळ दुर्लक्ष हेच कारण आहे. भारतामध्ये रेशीम उत्पादनाच्या बाबतीत जसे कर्नाटक आघाडीवर आहे तसेच जगाच्या बाजारामध्ये चीनने आघाडी घेतलेली आहे. अर्थात ते साहजिकही आहे.

मुळात रेशीम तयार करणारा कीडा शोधून काढून त्याच्यापासून रेशीम उत्पादन करण्याची पद्धती चीनमध्ये शोधण्यात आलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चीनमध्ये रेशीम मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. या देशात दोन कोटी लोकांची उपजीविका रेशमावर अवलंबून आहे. जगामध्ये रेशीम उत्पादनात भारताचा क्रमांक पाचवा आहे. आपण व्यवसायाकडे लक्ष दिले तर रेशीम उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक येऊ शकतो. परंतु रोजगार निर्मितीचे एक मुख्य साधन म्हणून याकडे सरकारने पाहिले पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये लोकांनी पॉलिस्टरच्या कपड्यांचा खूप वापर सुरू केला आहे. हे कपडे फाटत नसल्यामुळे लोक त्यांना प्राधान्य देतात. परंतु आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता पॉलिस्टरच्या कपड्यापेक्षा निसर्गात तयार झालेल्या कापसापासून तयार झालेले म्हणजे सुती कपडे घालणे अधिक फायदेशीर असते, असे आता लक्षात यायला लागले आहे. त्यामुळे कॉटनचे म्हणजे सुती आणि रेशमी कपडे वापरण्याकडे लोकांचा कल आहे. यूरोपीय देशांमध्ये रेशमी कपड्यांना प्रचंड मागणी येत आहे आणि रेशमाचे दरही वाढत आहेत. त्याचा फायदा करून घेण्यासाठी शेतकर्‍यांनी या व्यवसायाकडे वळले पाहिजे.

महाराष्ट्रात हा व्यवसाय नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यात चांगला रुजला आहेच पण आता तो पुणे जिल्ह्यातही केला जायला लागला आहे. सध्या पुणे जिल्ह्यात दोन हजार ५०० हेक्टर जमिनीवर हा उद्योग केला जात आहे आणि त्यातून अनेक शेतकर्‍यांनी चांगले उत्पन्न मिळवून आर्थिक स्थैर्य प्राप्त केले आहे. रेशमाचा किडा हा एक महिना जगतो आणि त्यातले २४ दिवस झाडांची पाने खातो. राहिलेल्या सहा दिवसात तो आपले घर बांधतो. सुरक्षित रहाण्याचा प्रयत्न करतो. आपल्या भोवती तो संरक्षक कवच तयार करतो. हे कवच म्हणजेच कोष. ते कोष प्राप्त केले की त्याच्यात त्याने खाल्लेल्या झाडाच्या पानाचे रूपांतर तलम धाग्यात होते. सहा दिवसात या कोषात ७०० ते १२०० मीटर लांबीचा तलम धागा तयार होतो. हा धागा प्राप्त करायचा आणि त्या पासून कपडा तयार करायचा हाच आपला रेशीम उद्योग.

रेशमाच्या किड्यांनी तयार केलेल्या या धाग्यांचे कोष उकळत्या पाण्यात टाकले जातात आणि त्यापासून धागा मिळवला जातो. महाराष्ट्र सरकार सध्या या कोषांची खरेदी करून सोळाशे कोटी रुपयांचे रेशीम विकते पण त्यात किती तरी जादा वाढ करता येते एवढी या धंद्याला संधी आहे. पुणे जिल्ह्यातले रेशीम आता जर्मनी, अमेरिका, स्पेन, ब्रिटन, रशिया या देशांना पाठवले जात आहे. या व्यवसायासाठी शेतात तुतीची झाडे लावावी लागतात किवा आपल्याकडे ती सोय नसल्यास जंगलातल्या अर्जुन, खैर, जांभूळ याही झाडांवर आपण रेशमी किडे जगवू शकतो आणि त्यापासूनही रेशीम मिळवू शकतो. महाराष्ट्रात तुतीची लागवड करण्यास अनुकूल वातावरण आहे आणि तुतीच्या झाडाच्या पानापासून चांगले रेशीम प्राप्त होत असते. म्हणून अनेक शेतकरी तुतीच्या झाडांपासूनच ते तयार करतात. तुतीचे झाड १५ वर्षे टिकते आणि हा व्यवसाय लहान मुले आणि महिलाही करू शकतात.

त्याचे दुसरे वैशिष्ट्य असे की हा धंदा दुधाच्या धंद्यापेक्षा कमी भांडवलात करता येतो आणि त्यापासून कमी कष्टात दुधाच्या धंद्यापेक्षा जास्त पैसा मिळतो. सरूवातीला या धंद्याचे तंत्र समजेपर्यंत अवघड वाटते पण एकदा हात बसला की मग काही प्रश्‍न येत नाही. आज महाराष्ट्रात काही शेतकरी एक एकर शेतात तुतीची लागवड करून तिच्यात रेशीम कीड्यांचे अंडकोष आणून कीडे सोडतात आणि त्यापासून किमान १५ हजार रुपये ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवतात. टसर रेशीम हाही एक प्रकार आहे. या प्रकारचे रेशीम जांभूळ, अर्जुन, बोर इत्यादी झाडांवर पाळल्या जाणार्‍या रेशीम कीड्यांपासून मिळवले जाते. याही प्रकारच्या रेशमाचे चांगले उत्पन्न मिळवणारे अनेक आदिवासी नंदूरबार, नाशिक, धुळे, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यात आहेत. काही आदिवासी कुटुंबांत तर रेशीम तयार करण्याची २०० ते २५० वर्षांची परंपरा आहे. याशिवाय मुगा आणि इरी याही दोन प्रकारचे रेशीम तयार होत असते. या प्रकारचे रेशीम तयार करण्यास स्वत:ची जमीन असण्याची काही गरज नाही. अशा रितीने स्वत:च्या शेतात किंवा जंगलात असे रेशीम तयार करून स्वत:ची उपजीविका साधणारांची संख्या देशात ६० लाख आहे.

Leave a Comment